जयगड सोसायटीमध्ये स्वखर्चाने ३० किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वयीत!
हरित उर्जेकडे स्वावलंबी वाटचाल; इतर सोसायट्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण

पिंपरी | पिंपरी–चिंचवड शहरातील जयगड सोसायटीने (पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत, PMRDA हद्दीत) आपल्या इमारतीवर स्वतःच्या खर्चातून ३० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारून एक हरित आणि स्वावलंबी पाऊल उचलले आहे. सरकारी अनुदानाशिवाय उभारलेला हा प्रकल्प देशातील पंतप्रधान आवास योजनेतील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प ठरला आहे.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा लोकार्पण सोहळा १५ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष मा. संजीवन सांगळे यांनी भूषवले. सोसायटीचे सर्व संचालक, सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजीवन सांगळे म्हणाले की, “जयगड सोसायटीने उभारलेला ३० किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प हा पर्यावरण रक्षणासोबतच आर्थिक बचतीसाठीही आदर्श ठरतो. या प्रकल्पामुळे सोसायटी ऊर्जा स्वावलंबी झाली असून, कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होईल. हा प्रकल्प इतर सोसायट्यांसाठी प्रेरणादायी आहे.”
हेही वाचा : संत साई हायस्कूलमध्ये क्रांती दिन सप्ताह साजरा

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोसायटीचे सचिव सोमेश्वर त्रिंबके यांनी केले. त्यांनी प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, “हा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण झाला असून यामध्ये कोणतेही अनुदान न घेता केवळ सभासदांच्या सहकार्यानेच संपूर्ण निधी उभारण्यात आला.”
अध्यक्ष हर्षद पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले आणि सांगितले की, “हरित ऊर्जा वापरून सोसायटीने दीर्घकालीन दृष्टिकोन स्वीकारला आहे. यामुळे देखभाल खर्चातही बचत होणार आहे.”
सौरऊर्जेचा उपयोग — भविष्याचा मार्ग:
संजीवन सांगळे यांनी शेवटी सांगितले की, “सौरऊर्जा प्रकल्प हे पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहेत. फेडरेशनच्या वतीने आम्ही शहरातील सर्व सोसायट्यांना आवाहन करतो की त्यांनीही आपल्या इमारतींवर सौर प्रकल्प राबवावेत आणि जयगड सोसायटीच्या पावलावर पाऊल ठेवावे.” जयगड सोसायटीचा हा उपक्रम म्हणजे सामाजिक, पर्यावरणीय आणि आर्थिक समविचारांची संगमवाणी ठरली आहे. पिंपरी–चिंचवडमधील इतर सोसायट्यांसाठी हे एक आदर्श मॉडेल ठरू शकेल, यात शंका नाही.
जयगड सोसायटीने उभारलेला ३० किलोवॅट सौरऊर्जा प्रकल्प हा केवळ पर्यावरण पूरक पाऊल नाही, तर ऊर्जा स्वावलंबनाच्या दिशेने एक ठोस आणि दूरदर्शी निर्णय आहे. यामुळे इतर सोसायट्यांनाही प्रेरणा मिळेल आणि पिंपरी-चिंचवड हरित शहर होण्याच्या दिशेने वेगाने पुढे जाईल. प्रत्येक सोसायटीने सौरऊर्जेसारख्या नैसर्गिक साधनांचा वापर करून पर्यावरण रक्षणात आपले योगदान दिले पाहिजे.”
– संजीवन सांगळे, अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.





