संत साई हायस्कूलमध्ये क्रांती दिन सप्ताह साजरा
शिक्षण विश्व: मनशक्ती व स्वामी विज्ञानानंद यांना समर्पित विशेष कार्यक्रमाने समारोप

पिंपरी | संत साई हायस्कूल, भोसरी येथे यंदा २४ वा क्रांती दिन सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट या कालावधीत देशभक्तीपर उपक्रम, मार्गदर्शन सत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने सप्ताह अधिक प्रभावी बनवण्यात आला.
यावर्षी शाळेमध्ये “कृतज्ञता वर्ष” साजरे केले जात असल्याने या निमित्ताने १४ ऑगस्ट रोजी “स्वामी विज्ञानानंद व मनशक्ती” या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी शाळेत देशभक्ती आणि मानसिक विकास यांचा संगम घडवणारा अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमापूजन आणि मशाल प्रज्वलनाने करण्यात आली. वातावरणात ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ या घोषणांनी देशभक्तीची लहर उमटली.कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक शिवलिंग ढवळेश्वर, मुख्याध्यापिका सुनीता ढवळेश्वर, ट्रस्टी पायल ढवळेश्वर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व पालक शिक्षक संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठा सक्षमीकरणासाठी आता ‘‘ॲक्शन प्लॅन’’
या विशेष कार्यक्रमासमनशक्ती रिसर्च सेंटरचे ट्रस्टी आणि जीवनदानी साधक प्रमोद शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या सोबत हेमराज हळंदे, अजय चंदने आणि संधन गुरुजी यांचीही उपस्थिती होती.मंजुषा वाळवेकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे संचालन दहावीच्या तन्मय रायपुरे, गौरी बैरागी आणि गायत्री देवरकोंडा या विद्यार्थ्यांनी केले. आभार प्रदर्शन आशा रावत यांनी केले.
विद्यार्थ्यांची सादर केलेली नाटिका ठरली आकर्षण
दहावीच्या विद्यार्थ्यांनी “मनशक्ती अभ्यास पद्धती” या विषयावर नाटिका सादर केली. या नाटिकेतून अभ्यासातील मनःशक्तीचा उपयोग, सकारात्मक दृष्टिकोन व ध्येय निर्धारण यांचे महत्व प्रभावीपणे मांडले गेले.





