इंद्रायणीनगर- भोसरी प्रभाग ८ मध्ये ‘राष्ट्रवादी’चा झंझावात
मिशन- PCMC : तुषार सहाणे यांचे शक्तीप्रदर्शन; प्रचाराला दणक्यात सुरुवात

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने वेग आला असून, प्रभाग क्रमांक ८ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार गट) जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपल्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराची अधिकृत सुरुवात करण्यात आली.
प्रचाराच्या पहिल्याच दिवशी बालाजीनगर, खंडेवस्ती आणि सेक्टर १२ (PMRDA) परिसरात उमेदवारांनी भव्य रॅली काढत आपली ताकद दाखवून दिली. या रॅलीत तरुणांचा उत्साह लक्षवेधी ठरला. विशेष म्हणजे, भर उन्हातही महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आपल्या लाडक्या नेत्यांना पाठिंबा देताना दिसले. ‘अजित भाऊंचे शिलेदार’ अशी ओळख असलेल्या उमेदवारांना पाहण्यासाठी ठिकठिकाणी नागरिकांची गर्दी उसळली होती.
हेही वाचा – प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपला तरुणांचा मोठा पाठिंबा!

विकासकामांची पावती, जनतेचा विश्वास दृढ
प्रचारादरम्यान सोसायट्यांमध्ये आणि प्रभागाच्या कानाकोपऱ्यात करण्यात आलेल्या विकासकामांची पावती जनतेकडून मिळत असल्याचे चित्र होते. “आजवर केलेल्या विकासकामांची दखल जनतेने घेतली आहे. मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजय निश्चित असल्याचा विश्वास वाटतो,” असे मत उमेदवारांनी व्यक्त केले. यावेळी अनेक नागरिकांनीही “जनता सदैव तुमच्या पाठीशी आहे,” अशा शब्दांत आपला पाठिंबा दर्शविला.
‘घड्याळ’ चिन्हाला साथ देण्याचे आवाहन
प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ‘घड्याळ’ ही निवडणूक निशाणी घरोघरी पोहोचवण्यात येत आहे. “प्रभागाचा कायापालट करण्यासाठी आणि रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटण दाबून चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा,” असे आवाहन करण्यात आले. आपल्या प्रभागातील चारही शिलेदार महानगरपालिकेच्या सभागृहात ताकदीने पाठवण्याचा निर्धार मतदारांनी व्यक्त केला.




