पहलगाम दहशतवादी हल्ल्यातल्या तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान; अमित शाह यांची लोकसभेत माहिती

Amit Shah | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज लोकसभेत जम्मू-कश्मीरमधील पहलगाम हल्ल्याशी संबंधित तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याची माहिती दिली. ऑपरेशन महादेव अंतर्गत भारतीय सेना, सीआरपीएफ आणि जम्मू-कश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सुलेमान शाह उर्फ हाशिम मूसा, अफगान आणि जिब्रान या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
अमित शाह यांनी सभागृहात सांगितले की, पहलगामचा हल्ला अत्यंत भयंकर आणि भीषण होता. त्यावर चर्चा होते आहे, ती झालीही पाहिजे. ऑपरेशन सिंदूरच्या आधी मी ऑपरेशन महादेव याची माहिती देतो आहे. सुलेमान, अफगाण आणि जिब्रान हे तीन दहशतवादी सेना, सीआरएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मारले गेले. सुलेमान हा लष्कर ए तोयबाचा कमांडर होता. पहलगाम हल्ला आणि गगनीर हल्ल्यात त्याचा सहभाग होता. अफगाण लष्कर ए तोयबाचा अतिरेकी होता. जिब्रानही याच प्रकारतला दहशतवादी होता. मी आज सदनाला हे सांगतो आहे की ज्यांनी बैसरनच्या खोऱ्यात आपल्या नागरिकांवर हल्ला केला त्यात हे तिन्ही दहशतवादी होते. या तिघांचाही खात्मा करण्यात आला.
हेही वाचा : श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे भक्तिभावाची मोफत उपवास फराळ सेवा
सीआरएफ, लष्कराचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांना मी लोकसभेतल्या सगळ्या सदस्यांतर्फे धन्यवाद देतो. ऑपरेशन महादेवची सुरुवात २२ मे २०२५ ला झाली. दुपारी एक वाजता पहलगामचा हल्ला झाला, त्यानंतर त्याच दिवशी म्हणजेच २२ एप्रिलला मी संध्याकाळी साडेपाचला पहलगामला भेट दिली, असं अमित शाह म्हणाले.
२३ एप्रिलला आम्ही एक बैठक घेतली. जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर, सीआरपीएफ यांची ही संयुक्त बैठक होती. त्यात आम्ही पहिला निर्णय केला की देशावर दहशतवादी हल्ला करणाऱ्या एकाही दहशतवाद्याला पाकिस्तानात पळून जाऊ दिलं जाणार नाही आणि आपण कुणालाही पळून जाऊ दिलं नाही त्यांना ठार केलं. २२ मे रोजी IB ला एक महत्त्वाची माहिती मिळाली. एका गावात दहशतवादी उपस्थित असल्याचं त्यांना कळलं. त्यानंतर २२ मे ते २२ जुलै या दहशतवाद्यांचे सिग्नल आपण तपासले. २२ जुलैला आपल्याला मोठं यश मिळालं कारण सेन्सॉरच्या माध्यमातून हे दहशतवादीच असल्याचं समजलं. त्यानंतर चार पॅराचे जवान, लष्कराचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांनी संयुक्त कारवाई सुरु केली. तीन दहशतवाद्यांचा सोमवारी आपण खात्मा केला. दहशतवाद्यांची रितसर ओळख पटवण्यात आली. कारण एनआयएने या दहशतवाद्यांना जेवण पोहचवणाऱ्या लोकांना ताब्यात घेतलं होतं. चार जणांनी ओळख पटवली की ज्या तिघांचा खात्मा केला तेच दहशतवादी होते ज्यांनी पहलगाम हल्ला केला, असंही अमित शाह म्हणाले.




