माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याचा दिवस ठरला? राष्ट्रवादीत दोन मतप्रवाह

मुंबई : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत मंगळवारपर्यंत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना अजित पवार यांनी आश्वासन दिल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार यांची पुण्यात लवकरच भेट होण्याची शक्यता आहे. या भेटीत कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन मतप्रवाह असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. एका गटाचा दावा आहे की, कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला अडचणींना सामोरे जावे लागेल. शेतकऱ्यांमधील रोष आणि कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गावागावांत मतदारांचा विरोध होण्याची भीती आहे. दुसरीकडे, दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, कोकाटे हे चार वेळा आमदार राहिलेले अनुभवी आणि वरिष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याची गरज नाही. या मतभेदांमुळे पक्षात चर्चांना उधाण आले आहे.
माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यामुळे मोठा गदारोळ उडाला. यावर कोकाटे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “वरच्या सभागृहात कामकाज तहकूब झाल्याने मी तिथे बसलो होतो. खालच्या सभागृहात काय सुरू आहे हे पाहण्यासाठी मी मोबाईलवर युट्युब पाहत होतो. त्यावेळी जाहिराती आल्या, त्या स्किप करताना दोन-तीन सेकंद लागले. विरोधकांनी फक्त 18 सेकंदांचा व्हिडीओ दाखवला, पुढचा भाग दाखवला नाही. माझे काम पारदर्शी आहे. मी कॅमेऱ्यासमोर गेम खेळण्याचा प्रश्नच येत नाही.”
हेही वाचा – राजनाथ सिंह करणार ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेला सुरूवात; सर्वपक्षीय बैठकीत एकमत
कोकाटे यांनी विरोधकांवर बदनाम करण्याचा आरोप केला असला, तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष आणि विधानसभेतील या कृतीमुळे त्यांच्यावर टीका तीव्र झाली आहे. विरोधी पक्षांनी, विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आहे.
राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना आणि शेतीविषयक अनेक प्रश्न प्रलंबित असताना कोकाटे यांच्या कृतीने जनक्षोभाला खतपाणी घातले आहे. छावा संघटनेने राज्यभरात रस्त्यावर पत्ते खेळून निषेध नोंदवला, तर शिवसेना (उबाठा) नेही पत्ते खेळून आंदोलन केले. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही कोकाटे यांच्या कृतीचा निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी कोकाटे यांच्या वर्तनाबाबत नाराजी व्यक्त केली असून, अजित पवार लवकरच यावर निर्णय घेतील, असे संकेत दिले आहेत. कोकाटे यांचा राजीनामा घेतल्यास पक्षातील एका अनुभवी नेत्याला गमवावे लागेल, तर न घेतल्यास शेतकऱ्यांचा रोष आणि निवडणुकीतील संभाव्य तोटा यांचा सामना करावा लागेल. येत्या मंगळवारपर्यंत या प्रकरणात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





