“आधी मनसोक्त हनीमूनचा आनंद, आता तेच ‘हनी ट्रॅप’ वाटतोय”; करुणा शर्मांचा स्फोटक सवाल

Karuna Sharma : महाराष्ट्राच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात हनीट्रॅप प्रकरणाने खळबळ उडवली आहे. तब्बल 72 क्लास वन अधिकारी आणि काही माजी मंत्र्यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेलिंग केल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे. या प्रकरणाने पावसाळी अधिवेशनात विधानसभेत प्रचंड गदारोळ घातला.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सभागृहात हनीट्रॅपचे चित्रीकरण असलेला पेन ड्राइव्ह सादर करत सरकारच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणावर आता करुणा शर्मा यांनी तीव्र भाष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
करुणा शर्मा यांनी एका व्हिडीओद्वारे या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, प्रशासकीय अधिकारी, मोठमोठे नेते आणि मंत्र्यांनी ‘हनी हनी’ म्हणत मनसोक्त हनीमूनचा आनंद घेतला. पण, मन भरल्यानंतर तेच हनी त्यांना ट्रॅप वाटायला लागलं आहे. कुठे चाललाय आपला महाराष्ट्र? माझ्याकडे मंत्र्यांचे आणि अधिकाऱ्यांचे हनीट्रॅपचे पुरावे आहेत, आणि योग्य वेळी मी हे सर्व चॅनेलवर उघड करेन, असा इशारा करुणा शर्मा यांनी दिला आहे.
हेही वाचा – ‘धर्मांतर करून मिळविलेले अनुसूचित जातींचे प्रमाणपत्र रद्द होणार ‘; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमधील घटनेमुळे या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. एका राजकीय नेत्याने अनौपचारिक संभाषणात 72 वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि काही माजी मंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचा खुलासा केला. नाशिकच्या मुंबई नाका पोलिस ठाण्यात एका महिलेने याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचे प्रमुख केंद्र बनले असून, यामुळे गोपनीय दस्तऐवज असामाजिक तत्त्वांपर्यंत पोहोचत असल्याचा गंभीर आरोप आहे.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना हनीट्रॅप प्रकरणाचा पर्दाफाश केला. त्यांनी सभागृहात हनीट्रॅपचे चित्रीकरण असलेला पेन ड्राइव्ह सादर केला. मंत्रालय, नाशिक आणि ठाणे हे हनीट्रॅपचे अड्डे बनले आहेत. यामुळे राज्यातील गोपनीय दस्तऐवज असामाजिक तत्त्वांच्या हाती लागत आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे, पण सरकार यावर बोलायलाही तयार नाही. तसेच नाना पाटोले यांनी सरकारच्या निष्क्रियतेवर टीका करत सखोल चौकशीची मागणी केली.





