गुरुवंदना!
"जे जे भेटले भूत, तया मानिजे भगवंत" असे संतवचन आहे. खरंतर गुरु बाबतीतही असेच म्हणता येईल. "जो जो भेटे वाटेवरी, त्याला आपला गुरु करी" असे म्हणता येईल.
आपल्याला भेटलेली प्रत्येक व्यक्ती ही काही ना काही उद्देशाने भेटणे हे परमेश्वराने नियत केलेले असते. प्रत्येकाकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळते. काही जणांकडून सकारात्मक काही शिकायला मिळाले नाही तरी कसे वागू नये ते शिकायला मिळते. मी एका कंपनीमध्ये कंपनी सचिव म्हणून काम करत होतो. बारा जणांच्या ऐसपैस संचालक मंडळात कॉर्पोरेट जगतातील “हूज हू” म्हणता येईल अशी व्यक्तिमत्वे होती. त्यांच्यामध्ये काही जणांकडून नक्कीच खूप काही शिकायला मिळाले आणि ते पुढील जिवनात खूप उपयोगी सुद्धा पडले. विचार करण्याची पद्धत बदलली, कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यामध्ये थोडीफार परिपक्वता आली, बोलणं, वागणं, बसणं यामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडत गेला. पण काही असेही होते की ज्यांच्याकडून कसे वागू नये, कसे बोलू नये याचे पाठ मिळाले. त्यामुळे त्यांचेही खरोखर मी कृतज्ञ राहिलाच हवे.
आपल्या आयुष्याच्या प्रवासात भेटणाऱ्या व्यक्ती आपल्याला आयुष्याचे पाठ देत असतात. आपल्याला भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला अनुभव तरी मिळतो किंवा धडा मिळतो. एखादी व्यक्ती पुढे गेल्यानंतर आपण इतरांशी बोलतो की त्याने असे वागायला नको होते. खरंतर याचा उत्तरार्ध असा असावा की यातून शिकून आपण आपण असे कसे वागणार नाही याबाबत काळजी घेण्याचा प्रयत्न करणे. तर मग अशा अर्थाने ती व्यक्ती आपली गुरु ठरते की. त्यामुळे एखाद्या ठिकाणी नको तसे वागणाऱ्या, नको तसे बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल तिरस्कार व्यक्त करण्यापेक्षा त्याने आपल्यावरती जो सकारात्मक परिणाम केलेला आहे त्याबद्दल त्याचे आभार मानले पाहिजेत. अशा प्रकारचे लोक समाजामध्ये वावरतात म्हणून चांगलं वागणाऱ्यांचं कौतुक होतं.
हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी वापरण्याचे नियोजन
श्री दत्तगुरूंनी चोवीस गुरू केले होते अशी कथा आहे. याचा अर्थ एवढाच की जेथून जे चांगले मिळालं तेथून ते त्यांनी घेतलं मला वाटतं ही मानसिकता घेऊन आपण जर चाललो तर आपल्याला ज्यांच्या ज्यांच्याकडून काही ना काही शिकायला मिळालं आणि त्याचा चांगला परिणाम आपलं व्यक्तिमत्व साकारण्यात झाला अशा सर्व गुरूंना आपण वंदन केले पाहिजे.
विषादप्यमृतं ग्राह्यम्
अमेध्यात अपि काञ्चनम्,
अमित्रात् अपि सद्वृत्तम,
बालादपि सुभाषितम्”
असं संस्कृत सुभाषित आहे. इथून जे चांगले मिळते तिथून ते घ्यावे. जिथे काही वाईट आहे ते न घेण्याची प्रवृत्ती आपल्यात निर्माण करावी.
लौकिक अर्थाने शाळेतले शिक्षक, महाविद्यालयीन प्राध्यापक, अन्य कुठल्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत असू तर तेथील आपल्याला मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक, अध्यात्मिक क्षेत्रातले गुरु किंवा जे खऱ्या अर्थाने आपले कधीही संबंधित नव्हते परंतु ज्यांच्याकडे पाहून आपण एकालव्याप्रमाणे काही साधना केली अशी व्यक्ती या सर्वांना आपण गुरुपौर्णिमेनिमित्त वंदन करूया. माझ्या जीवनात लौकिक अर्थाने अन्य गुरूंच्या बरोबरच माझ्या सर्व सुह्रुद आणि सन्मित्र यांचा फार मोठा भाग आहे. आज गुरु पौर्णिमेच्या पवित्र दिवशी या सगळ्यांबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. अनेकांच्या बाबतीत तर असे आपल्याला होता येईल का असा विचार अनेक वेळा मनात घोळत असतो आणि त्या दिशेने मी प्रयत्न सुरू करतो. अशा सर्व परात्पर गुरुंना आज हात जोडून विनम्र वंदन .
आपला माझ्या जीवनातील सहभाग केवळ दैवी आहे. कळत नकळत मी तुमच्या कडून खूप काही शिकलो. उर्वरित काळातही आपल्या व्यक्तिमत्वाचे अनुकरण करण्याचा माझा प्रयत्न राहील.
लोभ आहेच, तो वृद्धिंगत व्हावा ही विज्ञापना..
तस्मै श्री गुरवे नमः





