दोन्ही ठाकरेंनी मारली कलटी, विलिनीकरणाचा टांगा पलटी !
उद्धव आणि राज ठाकरे यांचे एकत्रीकरण किंवा विलीनीकरण होणार, या हालचालींमुळे त्यांच्या मते मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला एकदम उत्साह आला होता. अर्थात्, त्याला दुजोरा देणारे फक्त उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत हेच होते ! प्रत्यक्षात, महाराष्ट्राला किंवा मराठी माणसाला असे काहीच वाटत नव्हते. कारण, ते दोघे एकत्र येतील यावरच आता कुणाचा विश्वास उरलेला नाही!
ठाकरे बंधू मात्र खुश !
दोघे एकत्र आल्यामुळे ठाकरे ब्रँड पुन्हा एकदा खुलणार आणि फुलणार या कल्पनेने ठाकरे बंधू आणि त्यांचे जवळचे मित्र जाम खुश झाले असावेत. आपल्या एकत्र येण्याच्या संदर्भात जगभर एवढी चर्चा होते आहे, हे बघून या खुशीत भर पडली असावी. मिश्किली हा ठाकरे घराण्याचा ‘इनबिल्ट’ गुण आहे. शब्दांचे फटकारे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे होते आणि हे फटकारे आणि त्यांचे एकंदर दिलखुलास व्यक्तिमत्त्व यामुळे महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला देखील भुरळ पडली होती हा इतिहास आहे.
बाळासाहेबांना खुर्चीचा मोह नव्हता !
बाळासाहेब ठाकरे यांना खुर्चीचा मोह असता तर १९९६ मध्ये ‘युती’ ची सत्ता आली, तेव्हा त्यांना मुख्यमंत्री होणे अवघड नव्हते. तिकडे आंध्र प्रदेशात केवळ आपल्या लोकप्रियतेच्या आधारे एन. टी. रामाराव मुख्यमंत्री झाले होतेच ना!
सध्याच्या ठाकरे ब्रँडची ताकद
सध्या उद्धव आणि राज या बंधूंची एकूण ताकद किती हो? विधानसभेचे आमदार 20 अधिक 0 अशा जागा आहेत. लगेचच या जागांच्या आधारे राज्यात कोणतीही राजकीय क्रांती अपेक्षित नाही. शिवाय अशा एकत्र येण्याची चर्चा हे कोणीतरी सोडून दिलेले ‘पिल्लू’ आहे, हे स्पष्ट दिसते. दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे मोटारीत बसून निघाले, तेव्हा तिथे उपस्थित वाहिनीच्या पत्रकाराने त्यांना विचारले, कुठे दौरा? तेव्हा ‘मातोश्री’ वर चाललो आहे असे टणाटण उत्तर राज ठाकरे यांनी दिले. अर्थात ते ऐकणारे आणि बघणारे रिकामटेकडे असतातच. आपले अजय – अतुल म्हणतात, की त्यांनी व्यायाम करायला माणसे ठेवली आहेत. तसे काही दारुबाज म्हणतात, की कोणी आग्रह केला तरच आम्ही पितो.. आणि त्यांनी आग्रह करायला माणूस ठेवला आहे वगैरे..
हेही वाचा – आता दाऊदला पक्षप्रवेश देणार का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा संतप्त सवाल
घोड्यावर बसवणारे बरेच..
सध्या, घोड्यावर बसवणारे लोक बरेच झाले आहेत आणि ठाकरे बंधू आणि गांधी घराण्याचे राजपुत्र यांना घोड्यावर बसविण्याचा उद्योग सुरु आहे. राजकारणात धक्के देणारे पक्ष आणि नेते यशस्वी होतात. अशी धक्का देण्याची कला शरद पवार यांना अवगत आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी आनंद परांजपे यांना असेच अनपेक्षितपणे मूळच्या शिवसेनेतून उचलून मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणले होते, छगन भुजबळ नाही तसेच उचलले होते. तेव्हा ती बातमी गाजली होती. ठाकरे बंधू यांनी अशीच अगोदर चर्चा करुन जर ऐक्याची किंवा युती – आघाडीची घोषणा केली, असती तर कदाचित धमाका झाला असता. पण, दोन महिने होणार होणार अशी चर्चा करुन निष्पन्न काही नाही आणि अनेकांचा वेळ मात्र फुकट गेला आहे हे मान्यच करावे लागेल.
पुण्याईवर जिंकण्याचे दिवस संपले..
आता पूर्वजांच्या पुण्याईवर राजकारण करण्याचा काळ नाही. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याई मोठी आहे, यात वाद नाही, पण या पुण्याईचे वाटप झाले आहे. आता नव्या पिढ्यांना त्या आधारे फारसे काही करता येईल, असे दिसत नाही. राज ठाकरे गर्दी जमवतात पण, मते मिळत नाहीत, हे शरद पवार यांचे एक वाक्य बरेच काही सांगून जाते. उद्धव ठाकरे गर्दीचे रुपांतर मतांमध्ये करु शकतात, हे वाक्य देखील पवार यांचेच आहे. पण, बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेची पोहोच मुंबई, ठाणे, कोकण, मराठवाडा अशा ठिकाणी होती, तिथे आता विभाजन झाले आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाची अवस्था खेड्यापाड्यात अनेक गावांमध्ये फिरुन संध्याकाळी डेपोत येणाऱ्या एसटी सारखी करुन घेतली आहे. म्हणजे, काल ती ठाण्याला गेली असेल तर आज सकाळी मुरबाड गावात देखील जाऊ शकते आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाची परिस्थिती भाडे नाकारणाऱ्या रिक्षासारखी केली आहे. रिक्षा छान सजलेली आहे पण, ड्रायव्हर नुसता बसून आहे. कुठे जायलाच नको म्हणतो! थोडक्यात दोन्ही ठाकरेंचे पक्ष सध्या तरी बिनकामाचे दिसतात.
दोन्ही फुगे.. फुस्सस !
थोडक्यात, दोनही फुग्यांमधील हवा कमी झाली आहे. त्यात हवा भरण्याचे काम वाहिनीवाले करत आहेत. काजळून काळ्याकुट्ट झालेल्या भांड्याला कितीही कल्हई लावली, तरी ती चकाकत नाही हे साधे तत्त्व आहे. ज्यांना राजकीय अभ्यास करायचा आहे, त्यांनी ही वस्तुस्थिती जाणून घ्यायला हवी. दोन ठाकरे हे महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वाचे असले, तरी ते अनेक प्रवाहांपैकी आहेत.
चंद्राबाबूंचे उदाहरण..
आंध्र प्रदेशात २०१९ च्या निवडणुकीत चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाला वीस जागा देखील मिळाल्या नव्हत्या. पण, पाच वर्षांनी दीडशेहून अधिक जागा घेऊन ते सत्ताधारी झाले आहे. उलट, जगनमोहन रेड्डी दीडशे जागांवरुन पंधरा जागांवर आले आहेत. ठाकरे बंधू असे काही करणार असतील आणि महाराष्ट्रात सगळीकडे दौरे करुन पायाभरणी करणार असतील, तर त्यासाठी मोठी योजना तयार करावी लागेल. संजय राऊतांची दैनंदिन टकळी आणि सो काँल्ड अग्रलेख यातून महाराष्ट्रात काही राजकीय क्रांती होईल, अशी अपेक्षा मोबाईल पत्रकारांनी करु नये. ‘कुछ अच्छा दिखाओ भाई’, हवा कमी झालेल्या फुग्यांत पुन्हा हवा भरता येत नाही आणि खेड्यापाड्यात पडवीत असलेल्या चुलीतील विस्तव नुसती फुंकणी मारुन फुलवता येत नाही. पुन्हा सगळे सोपस्कार करावे लागतात. तुम्ही एकत्र आलात, तर कोणाचा विरोध नाही, पण एकत्र याच असा आग्रह अजिबात नाही. ठाकरे कोणाचे ऐकतात का ? त्यांना हवे तेच करतात. ठाकरे ब्रँड नव्याने उभारण्याच्या नादात ‘टांगा पलटी’ झाला आहे, हे अजून कसे लक्षात येत नाही ?





