Mission PCMC : महापालिका निवडणुकीत खरी लढत भाजपा अन् राष्ट्रवादीतच!
अजित पवार विरुद्ध महेश लांडगे विकासाच्या मुद्यांवर आमने-सामने?: भारतीय जनता पार्टी अन् राष्ट्रवादीसुद्धा स्वबळावर लढण्याच्या तयारीत!
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम घुमू लागले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असून, त्यासाठी भाजपा महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकांची चाहूल लागताच काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये स्थानिक नेत्यांच्या मागणीनुसार, ‘‘आम्ही स्वबळावर लढणार आहोत’’ अशी घोषणा केली आहे. तसेच, निवडणुकीनंतर महायुती म्हणून आम्ही एकत्र येवू, असा सावध पवित्राही फडणवीस यांनी घेतला आहे.
वास्तविक, 2017 मध्ये झालेली निवडणूक भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी होती. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हावर निवडून आलेल्या माजी नगरसेवकांना भाजपासोबत असल्यात तिकीट कापले जाईल, याची भिती आहे. कारण, 2022 मध्ये कार्यकाळ संपल्यानंतर महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाली होती. त्यामुळे नगरसेवकांचा तसा प्रभागातील प्रभाव आणि जनसंपर्क कमी झालेला आहे. त्यामुळे भाजपा महायुतीमध्ये तिकीटासाठी झगडावे लागेल, अशी असुरक्षितता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या इच्छुकांना सतावत आहे. तिकीट वाटपामध्ये भाजपाच्या स्थानिक नेत्यांचा वरचष्मा राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक नेते स्वळावर लढण्यासाठी आग्रही आहेत.
परिणामी, पिंपरी-चिंचवडसह, पुणे महापालिकेमध्ये खरी लढत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये होईल, असे चित्र आहे.
आमदार महेश लांडगे भाजपाचा स्थानिक प्रभावशाली चेहरा
दुसरीकडे, पुणे आणि पिंपरी-चिंचवड भाजपा स्वबळावर लढणार हे जवळपास निश्चित मानले जाते. त्यामुळे भाजपा राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्थानिक चेहरा म्हणून आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वात निवडणूक होणार आहे. कारण, 2017 मध्ये स्थानिक नेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी विरोधात विजयी कामगिरी केली होती. आताच्या निवडणुकीत आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे स्थानिक पातळीवर कामगिरी करणार आहेत. अनुभवाच्या निकषावर लांडगे भाजपाचा प्रभावशाली स्थानिक चेहरा आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाला हवा प्रभावशाली स्थानिक चेहरा..!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1997 ते 2017 पर्यंत 20 वर्षे पिंपरी-चिंचवडचा कारभार एकहाती सांभाळला होता. 2017 नंतर भाजपाची सत्ता आली. आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी भाजपा महायुतीचा घटक पक्ष असला, तरी स्थानिक पातळीवर भाजपा आणि राष्ट्रवादीचे सूर जुळत नाहीत. त्यामुळे स्वबळावर लढायचे, तर स्थानिक प्रभावशाली चेहरा राष्ट्रवादीला तयार करावा लागेल. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूक झाली. काही नेत्यांनी ‘तुतारी’ हातात घेतली. महायुतीच्या उमेदवारांविरोधात काम केले. तेच नेते आता पुन्हा अजित पवार यांच्यासोबत जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र, Political credibility गमावलेल्या नेत्यांना सोबत घेऊन महापालिकेत उल्लेखनीय कामगिरी करता येणार नाही. त्यामुळेच अजित पवार यांनी ‘‘माझा चेहरा चांगला आहे, पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये माझ्याच चेहऱ्यावर निवडणूक लढवणार’’ असे सूतोवाच केले होते.







