श्रावण हार्डीकर सर्वात निष्क्रिय आयुक्त – खासदार आढळराव पाटील
- गोपनीय माहिती पुढा-यांना दिल्याचा आरोप
- चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भोसरीतील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची चारवेळा मागणी केली. त्याची माहिती गोपनिय ठेवणे आयुक्त श्रावण हार्डीकरची जबाबदारी होती. मात्र, त्याने ती पाळली नाही. उलट स्थानिक पुढा-यांच्या संगणमताने माझ्या बदनामीसाठी मागणीची प्रत विरोधकांच्या हाती दिली. हार्डीकर आजपर्यंतच्या इतिहासातला सर्वात निष्क्रिय आयुक्त आहे. गोपनीय माहिती लीक झाल्याची सखोल चौकशी होऊन त्याच्यावर फौजदारी कारवाई व्हावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जोपर्यंत हार्डीकरवर कारवाई होत नाही, तोपर्यंत स्वस्त बसणार नाही, असा इशारा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील एमआयडीसी, आयटी पार्कमध्ये माझ्या भागातील लेकी-बाळी नोकरी करतात. सायंकाळी घरी येत असताना त्यांना बसची वाट पाहत भोसरीतील याठिकाणी उभे रहावे लागते. मात्र, तेथील अतिक्रमणांवर गावगुंडांचा ताबा असल्याने त्यांचा राजकीय हैदोस याठिकाणी सुरू असतो. अनेकदा स्थानिक गुंडांकडून मुलींची छेड काढण्यात आली आहे. महिला, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने तेथील अतिक्रमणीत टप-यांवर कारवाई करण्याची आयुक्त हार्डीकरांकडे चारवेळा मागणी केली. पंधरा दिवस उलटले तरी कारवाईचा पत्ता नाही. शेवटी अधिकारी राजन पाटील याच्यावर कारवाई केली. मात्र, अतिक्रमणावर कारवाईस टाळाटाळ केली. पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचेही रडगाणे गायले. शेवटी मी स्वतः पोलीस मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. त्यानंतर कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या. सर्व टपरीधारकांना नोटीसा बजावल्या. उद्या कारवाई होणार म्हणताच माझ्या मागणीचे पत्र स्थानिक पुढा-यांच्या हाती दिले. त्या संबंधित “दादा”गिरी करणा-या नेत्यांच्या बगलबच्यांनी सर्व टपरीधारकांना एकत्र बोलावून माझे पत्र वाचून दाखविले. ही कारवाई आमच्यामुळे नाही, तर खासदार आढळराव पाटील यांच्यामुळे होत असल्याचे सांगितले. या सर्व प्रकाराला आयुक्त हार्डीकराने साथ दिली, असा आरोप खासदार आढळराव पाटील यांनी ‘महा-ई-न्यूज’शी बोलताना केला आहे.
आयुक्त हार्डीकर हा राजकीय हेतुने प्रेरीत होऊन काम करतो. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भ्रष्टाचारात त्याचा सहभाग आहे. सर्वात निष्क्रिय आयुक्त असून आजपर्यंतच्या आयुक्तांच्या कारकिर्दीला काळिमा फासण्याचे काम हार्डीकर करत आहे. सत्ताधा-यांच्या हातातलं बाहुले बनला आहे. मी केलेल्या मागणीची प्रत्र प्रशासकीय स्तराव गोपनिय रहायला पाहिजे. परंतु, त्याने पत्राची प्रत भोसरीतील पुढा-यांच्या हातात दिली. माहिती गोपनीय ठेवणे त्याची जबाबदारी आहे. याबाबत विचारले असता, माहितीचे पत्र कार्यालयातील कोणीही पाहतो, असे उत्तर आयुक्त देत आहे. त्याचं कार्यालय म्हणजे धर्मशाळा नव्हे. या सर्वाला जबाबदार आयुक्त आहे. त्याची सखोल चौकशी करून त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. जोपर्यंत याचा छडा लागत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असेही खासदार आढळराव पाटील यांनी ठणकाऊन सांगितले.
भोसरीतील त्या अतिक्रमणीत टपरीधारकांकडून तेथील गावगुंड, पुढारी यांना वर्षाला प्रत्येकी सुमारे एक लाख, दीड लाख रुपये भाडे मिळते. कारवाईची मागणी केल्यामुळे तेथील राजकीय पुढा-यांनी प्रशासनाला हाताशी धरून मझ्या बदनामीचे कारस्तान केले आहे. आयुक्त हार्डीकर त्यांना साथ देत आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना खासदार