ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा आगळ्यावेगळ्या कारणासाठी सन्मान
‘नोबेल पारितोषिक विजेत्यांकडून माझ्यासाठी अनोखा सन्मान : अनुपम खेर
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना त्यांच्या अभिनयकौशल्यासाठी आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. बॉलिवूड इंडस्ट्रीतील कसलेल्या कलाकारांपैकी ते एक आहेत. आजवरच्या करिअरमध्ये त्यांना विविध भूमिकांसाठी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. मात्र नुकताच त्यांचा एका अशा कारणासाठी सन्मान केला गेलाय, जे पाहून खुद्द अनुपम खेर यांनीसुद्धा आश्चर्य व्यक्त केलंय. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलकडून अनुपम खेर यांना हा सन्मान मिळाला आहे. या कार्यक्रमातील फोटो पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली. ‘मला सर्वांत आश्चर्यकारक कारणासाठी सन्मानित केलंय’, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय.
अनुपम खेर यांची पोस्ट-
‘नोबेल पारितोषिक विजेत्यांकडून माझ्यासाठी सर्वांत अनोखा सन्मान: अभिनय किंवा चित्रपटसृष्टीतील माझ्या योगदानाव्यतिरिक्त मला यापूर्वी अनेक कारणांसाठी पुरस्कार मिळाले आहेत. पण काल रात्री सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलकडून नोबेल पुरस्कार विजेते प्रा. जेम्स ॲलिसन आणि प्रा. पद्मणी शर्मा यांनी मला सर्वांत आश्चर्यकारक कारणासाठी सन्मानित केलं. हा सन्मान माझ्या आशावादाच्या तत्वज्ञानासाठी होता. जगातील वैद्यकीय राजेशाही दोन्ही बाजूंनी माझ्यासोबत आहे याचा मला खूप आनंद आहे. इल्युमिनेट आँकोलॉजी टाऊनहॉल 2.0 कार्यक्रमात मला मिळालेल्या या सुंदर सन्मानाबद्दल मी रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल आणि डॉ. शेवंती लिमये यांचे आभार मानतो. जय हो,’ अशा शब्दांत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘कुछ भी हो सकता है’ आणि ‘आशावाद’ असे हॅशटॅग्ससुद्धा जोडले आहेत.
हेही वाचा – शहरातील कोणत्याही भागातून मिळणार विमानतळासाठी मेट्रोची कनेक्टिव्हीटी
अनुपम खेर यांनी आतापर्यंत तब्बल 500 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. गेल्या चार दशकांपासून ते अभिनयक्षेत्रात कार्यरत आहेत. आजवर त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार, आठ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. तर 2004 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि 2016 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मान केला. अनुपम खेर यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ‘हम आपके है कौन’, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’, ‘खोसला का घोसला’ यांसारख्या चित्रपटांमधील भूमिकांद्वारे प्रेक्षकांना हसवलं. तर ‘अ वेडन्स्डे’सारख्या चित्रपटात त्यांनी अत्यंत पॉवरफुल भूमिका साकारली. नुकतेच ते कंगना राणौत यांच्या ‘द इमर्जन्सी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.