कचरा करणाऱ्यांकडून एका महिन्यात ६० लाखांची दंडवसुली
पुणे : शहरातील सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर पुणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात महापालिकेच्या घनकचरा विभागाने शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कारवाई करून एका महिन्यात ६० लाखांपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यलयांपैकी कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाने सर्वाधिक ९ लाख १९ हजार २५८ रुपयांचा दंड वसूल केला आहे.
महापालिकेच्या घनकचरा विभागाने १ ते ३१ जानेवारीदरम्यान ७ हजार ५९३ नागरिकांकडून ६० लाख २९ हजार ९८० रुपयांचा दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा जाळणे, वर्गीकरण न करता ओला आणि सुका कचरा देणे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर, जैववैद्यकीय कचरा, प्राण्याद्वारे होणारी अस्वच्छता, कबुतरे आणि पारव्यांना उघड्यावर खाद्य टाकणे अशा विविध कारणांसाठी हा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचा – पुणे विमानतळावरील ‘डिजियात्रा’ सुरू होणार
शहरातील रस्त्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, तसेच अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून महापालिकेच्या वतीने हा दंड वसूल केला जातो. यापूर्वी शहरात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने शहारातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडे दिली होती. मात्र, दैनंदिन कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेच्या कामामुळे क्षेत्रीय कार्यालयांकडून शहरात प्रभावीपणे ही कारवाई होत नव्हती. यामुळे महापालिकेने इंदूर महापालिकेच्या धर्तीवर पुणे शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर गस्ती पथकांची निर्मिती केली आहे.
घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम म्हणाले, शहरात सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड घेतला जात आहे. नागरिकांनी अस्वच्छता करू नये, यासाठी जनजागृतीही केली जाते. यापुढील काळात ही कारवाई अधिक तीव्र केली जाईल.