‘येत्या दोन वर्षांत म्हाडातर्फे लाखभर घरे’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/pune-2-4-780x470.jpg)
पुणे : “सर्वसामान्य नागरिकांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. येत्या दोन वर्षांत म्हाडाच्या माध्यमातून राज्यात सुमारे एक लाख घरांच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे,’ असे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
म्हाडाच्या पुणे विभागातील 3 हजार 662 सदनिकांची ऑनलाइन सोडत जिल्हा परिषदेच्या सभागृहात घेण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे येथून आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबई येथून ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, म्हाडा पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे आदी उपस्थित होते.
हेही वाचा : ‘खंडणी मागाल तर मकोका लावणार’; अजित पवारांचा कडक शब्दात इशारा
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णतः ऑनलाइन या संगणकीय प्रणालीद्वारे ही सोडत प्रक्रिया राबविण्यात येत आहे. सोडतीत विजेत्या अर्जदाराला सूचना पत्र पाठविले जाते व त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्यांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाते. ही प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक असून, त्यासाठी कुठलाही मध्यस्थ, दलाल नाही. तर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुणे मंडळाने मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
– सर्वसामान्य नागरिक, काम करणाऱ्या महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ठिकठिकाणी वसतिगृह उभारले जाणार
– विजेत्या अर्जदारांना तत्काळ सदनिकांचा ताबा देण्यात यावा
– शासन विविध योजनांच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करीत आहे
– म्हाडाने गेल्या दीड वर्षांत १३ सोडतींच्या माध्यमातून सुमारे ३० हजार घरे उपलब्ध करून दिली.