राज्यात आर्टिफिशियल इंटेलिजेंस विद्यापीठाची स्थापना होणार; उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठासंदर्भात समिती गठीत करण्याचे आदेश
![Chandrakant Patil said that an Artificial Intelligence University will be established in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/01/Chandrakant-Patil-said-that-an-Artificial-Intelligence-University-will-be-established-in-the-state-780x470.jpg)
मुंबई | विकसित भारत 2047 मिशनच्या यशस्वी पूर्ततेसाठी आणि भारताच्या 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचालीसाठी शिक्षण आणि तंत्रज्ञान यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ लवकरच स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, बी वेणूगोपाल रेड्डी, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, उपसचिव अशोक मांडे, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.प्रमोदनाईक उपस्थित होते.
हेही वाचा : PCMC | रील, गाणे, रॅपमधून करा मालमत्ताकर भरण्याचे आवाहन
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अत्याधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना आणि तरुणांना आवश्यक आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचे आणि जागतिक स्पर्धेत सक्षम ठेवणारे ज्ञान उपलब्ध होईल असे विद्यापीठ असावे.
माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार म्हणाले, आर्टीफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान भविष्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. एआय किंवा संबंधित क्षेत्रांवर प्रभुत्व मिळविल्यास मोठ्या आणि फायदेशीर रोजगाराच्या संधी मिळू शकतात. या पार्श्वभूमीवर देशात पहिल्या एआय विद्यापीठाची स्थापना होईल.
यासंदर्भात एक विशेष कृतीदल (टास्क फोर्स) स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव, बी वेणूगोपाल रेड्डी, माहिती तंत्रज्ञान प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर,उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.प्रमोद नाईक, परेश पागे यांचा समवेश आहे.