शरद पवार, उद्धव ठाकरे लवकरच भाजपसोबत दिसतील; बच्चू कडू यांचा दावा

Bacchu Kadu | विधानसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीला मोठं यश मिळालं, तर महाविकास आघाडीला मोठ्या अपयशाला समोरं जावं लागलं आहे. यानंतर आता महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तवली जात आहे. यातच ठाकरे गटाने आगामी महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेत दिले आहेत. यावरून माजी मंत्री बच्चू कडू यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत मोठा दावा केला आहे.
बच्चू कडू म्हणाले, की आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे दोन ते तीन विधेयक पास होण्यासाठी भाजपाबरोबर अडकून राहिले आहेत. मात्र, त्या दोन ते तीन विधेयकांवर शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची कदाचित केंद्रातील भाजपा सरकारला गरज पडणार आहे. त्यामुळे राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता टाळता येत नाही.
हेही वाचा : महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बुस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, बच्चू कडू यांच्या विधानावर आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की बच्चू कडू हे आमचे मित्र आहेत. मात्र, त्याचं हे विधान हास्यास्पद आहे. त्यांचं आडनाव कडू आहे गोड नाही, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं हास्यास्पद विधान करू नये, असं आशिष शेलार म्हणाले.





