ताज्या घडामोडी

‘भाजपा’ चा अनोखा फंडा, दिल्लीवर फडकणार झेंडा !

दिल्ली विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या, भारतीय जनता पार्टीने कंबर कसली ! सध्या सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे देखील कच्च्या गुरुचे केले नसल्यामुळे त्यांनी प्रत्येक बाबतीत भाजपच्या डावाला प्रतिडाव टाकण्याचे धोरण सध्या अवलंबले आहे. वाटेल ते करून दिल्ली जिंकायची, हे भाजपाचे धोरण असून गेले दोन-तीन वर्षे त्यांच्याकडून त्या दिशेने फासे टाकले जात आहेत. देशात अनेक राज्यांमध्ये सत्ता असली तरी देशाच्या राजधानीवर वर्चस्व नसणे, ही नामुष्की असल्याचे भाजपाच्या नेत्यांना वाटते, आणि आत्ता यावेळी दिल्ली जिंकण्याच्या दृष्टीने वेगवेगळे फंडे आखले जात आहेत !

दिल्लीतील निवडणुका फेब्रुवारीमध्ये असून 8 फेब्रुवारीला दिल्लीत भाजपाचे सरकार असेल, असा मजकूर असणारे अनेक फलक दिल्लीमध्ये लागले आहेत. अशा मजकुराने सोशल मीडियाही सध्या फुलून गेला आहे. कोणत्याही परिस्थितीत दिल्ली जिंकायची असा घाट भाजपाने घातला असून यावेळी साम-दाम-दंड-भेद या सूत्रीचा वापर करून जिंकण्यासाठी भाजपातर्फे आखणी केली जात आहे.

दिल्लीत कमळ फुलणारच !

शेजारील राज्यांप्रमाणेच दिल्लीतही यावेळी निश्चितपणे कमळ फुलेल, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. आपला पक्ष आता दिल्लीला सर्वश्रेष्ठ राजधानीचा दर्जा देऊ शकतो, दिल्लीला शिक्षण, संस्कृती, सुरक्षा, आरोग्य अशा योजनांसाठी केंद्र सरकारने ७५ हजार कोटी रुपये दिले याची पंतप्रधानांनीच आठवण करून दिली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. दिल्ली हे विकासाचे जगातील आदर्श मॉडेल ठरले पाहिजे, हा भाजपा पुढाकार घेणार आहे आणि प्रचार करणार आहे. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असेल, तर दिल्लीच्या विकासाला डबल इंजिनचा लाभ मिळू शकतो, हे पारंपारिक ब्रीद वाक्य आणि प्रचाराचा मोठा भाग भाजपाने पुन्हा पुन्हा सांगण्यास सुरुवात केली आहे.

तीन राजकीय पक्षांची झुंज

यावेळी दिल्ली विधानसभेवर कुणाचा झेंडा फडकणार? आम आदमी पक्षाचा, भाजपाचा की काँग्रेसचा? या प्रश्नाने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या वेळी 70 पैकी 67 जागा जिंकून केजरीवाल यांनी भाजपाला धोबीपछाड मारली होती. पण, त्या दिवसापासून भाजपाने केजरीवाल सरकारची चोहोबाजूंनी कोंडी केली असून त्यांना रोज नवनव्या प्रकरणात अडकवण्याचे डाव टाकले आहेत. केजरीवाल सरकार पूर्णपणे बदनाम करण्यात भाजपाला यश आले आहे.

दरम्यानच्या काळात भाजपाच्या जोरदार आरोपांचे खंडन करणे केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला शक्य झालेले नाही, याचा फायदा निश्चितपणे भाजपा उचलणार आहे, हे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे. या निवडणुकीचे वातावरण तापायला खऱ्या अर्थाने सहा महिन्यापूर्वीपासूनच सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी आप, भाजपा व काँग्रेस हे तीनही पक्ष सज्ज झालेत. या तीनही पक्षांनी आपल्या बहुसंख्य उमेदवारांच्या नावाचीही घोषणा केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तीनही पक्षात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना जोर चढला आहे.

‘आप’ चा कारभार वाटोळे करणारा

दिल्लीचा विकास केवळ भाजपाच करू शकेल, भारताला जगात तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्याच्या गौरवशाली यात्रेत दिल्लीकरांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. गेल्या दहा वर्षांतील दिल्लीतील आप सरकारचा कारभार घोटाळे व भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे. हाच भाजपाचा प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. आप सरकार आप-दाहून कमी नाही, अशी खिल्ली पंतप्रधानांनीच उडवली आहे. ‘शीशमहल’ या दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थानावर सुशोभीकरणासाठी ३३ कोटी खर्च झाले, दिल्लीकरांच्या पैशाची ही उधळपट्टी आहे, असा भाजपाने प्रचाराचा मुद्दा बनवला आहे.

दिल्लीच्या शेजारी असलेल्या राज्यांप्रमाणेच दिल्लीतही आता कमळ फुलेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. भाजपाच केवळ दिल्लीला सर्वश्रेष्ठ राजधानीचा दर्जा देऊ शकते. दिल्लीला सुरक्षा, आरोग्य व विकास योजनांसाठी केंद्र सरकारने ७५ हजार कोटी रुपये दिले याची पंतप्रधानांनीच आठवण करून दिली आहे. दिल्ली हे शहरी विकासाचे जगातील आदर्श मॉडेल ठरले पाहिजे, हा भाजपाचा प्रयत्न राहील. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असेल तर दिल्लीच्या विकासाला डबल इंजिनचा लाभ मिळू शकतो, असे त्यांनी ठासून सांगितले आहे.

दिल्लीवर विविध योजनांचा वर्षाव

दिल्ली मेट्रो ही दिल्लीच्या कानाकोपऱ्यांत भाजपानेच पोहोचवली आहे. नमो ट्रेन सेवा, राज मार्ग, फ्लायओव्हर, हे सर्व केंद्रानेच केले आहे. गरिबांसाठी पंतप्रधान निवारा योजना हे तर दिल्लीतील जनतेला वरदान ठरले आहे. रेवड्या वाटपाशिवाय निवडणूक जिंकता येत नाही हे सर्व राजकीय पक्षांना ठाऊक झाले आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा या तिन्ही राज्यांत भाजपाने रेवड्या वाटून सत्ता काबीज केली. यापासून सर्वच राजकीय पक्षांनी त्याचे अनुकरण सुरू केले. आम आदमी पक्षाचे संयोजक व संस्थापक अरविंद केजरीवाल व मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र व मध्य प्रदेशमधील भाजपा सरकारची लाडकी बहीण योजना ‘आप’ ने अगोदरच चोरली आणि जाहीरही करून मतदारांना आकर्षित केले आहे.

आयारामांना उमेदवारी

आम आदमी पक्षातून भाजपामध्ये आलेल्या अनेकांना भाजपाने उमेदवारी दिली आहे, हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली मतदारसंघातून, मुख्यमंत्री आतिशी कालकाजीतून, सौरभ भारद्वाज ग्रेटर कैलाशमधून, तर सत्येंद्र जैन शकूर बस्तीमधून निवडणूक लढवत आहेत.

चौथ्यांदा सत्ता अवघड

आम आदमी पक्षाला आता चौथ्यांदा दिल्लीची सत्ता काबीज करणे यंदा महाकठीण आहे. ‘आप’ ला २०१३ मध्ये पहिल्यांदा सत्ता मिळाली. पण, सरकार दीड वर्षांतच कोसळले. काँग्रेसच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित व त्यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करून २०१५ मध्ये ‘आप’ ने दिल्लीवर पुन्हा सत्ता मिळवली. गेली दहा वर्षे सलग दिल्लीत ‘आप’ चे सरकार आहे. आता भाजपाने केजरीवाल यांना भ्रष्टाचाराने बरबटलेला नेता म्हणून खलनायक ठरवले. मद्यविक्री घोटाळ्यावरून अरविंद केजरीवाल, संजय सिंह व मनीष सिसोदिया हे सर्व ‘आप’ चे दिग्गज नेते जेलवारी करून आले आहेत. भ्रष्ट कारभारावरून भाजपाने आपची कोंडी केली आहे. यंदा दिल्ली विधानसभेवर कोणाचा झेंडा फडकणार याची देशभर उत्सुकता आहे, पण, त्यात भारतीय जनता पार्टी बाजी मारणार यात शंका नाही !

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button