डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; हेल्मेट फुटून डोक्याचा चेंदामेंदा

महाळुंगे : दुचाकीला ओव्हरटेक करत असताना डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार डंपरच्या चाकाखाली आला. डंपरच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचे हेल्मेट फुटून डोक्याचा चेंदामेंदा झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 7) सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील निघोजे येथे महिंद्रा कंपनीच्या गेट नंबर दोन समोर घडला.
सुजित सुरेशराव उंबरकर (वय 42) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी विश्वदीप विलास शिंदे (वय 25, रा. आकुर्डी) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर (एमएच 14/बीजे 0018) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – राज्यावर दुहेरी संकट! शेतकऱ्यांसाठी अलर्ट जारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वदीप शिंदे यांचा मित्र सुजित हे दुचाकीवरून तळवडे येथून महाळुंगे येथे जात होते. निघोजे मधील महिंद्रा कंपनीच्या गेट नंबर दोन समोर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला डंपरने ओव्हरटेक केले. ओव्हरटेक करत असताना डंपरची दुचाकीला धडक बसली. त्यामुळे सुजित हे रस्त्यावर पडले. त्यांनी हेल्मेट घातलेले होते. मात्र ते डंपरच्या चाकाखाली अडकल्याने हेल्मेट फुटून त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. यामध्ये सुजित यांचा जागीच मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.




