दुचाकीवरून जात असलेली महिला नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी
वापरकर्त्यांच्या मागणीमुळे चोरीछुपे नायलॉन मांजा विक्री, कारवाई कधी
नाशिक : दुचाकीवरून जात असलेली महिला नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झाली. येथील कन्नमवार पूल परिसरातील ट्रॅक्टर हाउसजवळ सोमवारी (ता. ६) ही घटना घडली. पतीच्या वेळेत लक्षात आल्याने हानी टळली. दरम्यान, वापरकर्त्यांच्या मागणीमुळे चोरीछुपे नायलॉन मांजा विक्री होत आहे. अशा वापरकर्त्यांवर कारवाई कधी होणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
पखाल रोड येथील सना अझरुद्दिन शेख या पती आणि सात वर्षांच्या मुलासह दुचाकीवरून आडगावकडून द्वारकाच्या दिशेने येत होत्या. कन्नमवार पुलाच्या दोन्ही बाजूंनी नायलॉन मांजा अडकला होता.
पती अझरुद्दिन शेख यांना नायलॉन मांजा अडकल्याचे लक्षात आल्याने त्यांनी स्वतःची मान खाली करीत मागे बसलेल्या पत्नी आणि मुलास खाली मान करण्यास सांगितले. तत्पूर्वी, मांजाने सना यांच्या नाक, कान, डोळ्यांच्या वरील आणि खालील भाग कापला जाऊन त्या गंभीर जखमी झाल्या. तत्काळ रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. दुचाकीचा वेग कमी असल्याने सुदैवाने वाहन घसरून अपघात झाला नाही. शिवाय, शेख यांनी मान खाली केल्याने त्यांना इजा झाली नाही.
पतंग उडविणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा वापर केला जात आहे. दरम्यान, हाच मांजा रस्ते, पूल आणि वृक्षांना अडकून अपघात घडत आहेत. अशा विविध ठिकाणी अडकलेल्या मांजात अडकून पक्षी जखमी होत आहेत.
वाहनचालकांनाही मांजाचा फास लागून जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत. पोलिसांनी केवळ विक्रेत्यांवरच कारवाई करून थांबू नये. वापरकर्त्यांवरही कारवाई करावी. तसे झाले तर दुकानदारांकडे नायलॉन मांजाची मागणी होणार नाही.
त्यामुळे पोलिसांनी वापरकर्त्या लहान-मोठ्या सर्वांवरच कारवाई करीत त्यांच्याकडील मांजा जप्त करावा. इमारतीचे छत, मोकळे मैदान तसेच रस्त्यांवर पतंगबाजी करणाऱ्यांची तपासणी पोलिसांकडून करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.
बुरख्याने वाचविले प्राण
सना शेख यांनी बुरखा परिधान केलेला होता. त्यामुळे चेहरा, गळा संपूर्ण बुरख्याच्या कपड्याने सुरक्षित होता. मांजामुळे बुरख्याचा काही भाग कापला जाऊन त्या गंभीर जखमी झाल्या. बुरखा नसता तर कदाचित मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने बुरख्याच्या कापडाने त्यांचे संरक्षण केल्याने त्यांचे प्राण वाचले.
कन्नमवार पूल रस्त्यावर अडकलेला नायलॉन मांजा अचानक समोर येऊन अपघात घडला. अशा मांजाचा वापर करणाऱ्यांवर कारवाई करावी. जेणेकरून कुठल्याही भागात मांजा अडकणार नाही व अशा प्रकारचे अपघात टाळण्यास मदत होईल.





