‘लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो’; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

मुंबई | बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. हत्येच्या आधी त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना अत्यंत निर्घृण पद्धतीने ठार करण्यात आलं. या प्रकरणात तीन आरोपींना अटक झाली आहे. तसंच या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा सोमवारी पोलिसांना शरण आला आहे. वाल्मिक कराडला १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यादरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले, की पोलिस स्टेशनध्ये बेड घेऊन गेले आहेत. पोलीसांसाठी नेले असल्याचं सांगितलं जात आहे. यापूर्वी कधी पोलीस स्थानकात पोलीस कधी कॉटवर झोपल्याची माहिती नाही. हे कोणाचे लाड आहेत? वाल्मिक कराडचे लाड पुरवण्यासाठी, त्याला पोलीस कोठडीत असताना बेडवर झोपवण्यासाठी नेले आहेत का? याची चौकशी झाली पाहिजे.
हेही वाचा – इंद्रायणी साहित्य संमेलनाचे रविवारी श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन
मला काल जी माहिती मिळाली ती अशी आहे की, मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काऊंटरही होऊ शकतो. म्हणून पोलिसांना विनंती आहे की, मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काऊंटर करू नका, हा बिचारा म्हणणार नाही पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर होणार असेल तर तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता आहे. मला काल विश्वसनीय माहिती, जवळच्या एका उच्चपदस्थ अधिकार्याने दिली. काहीही होऊ शकतं, अशी शक्यता या प्रकरणामध्ये आहे, असा मोठा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.




