सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी; अभिनेत्री प्राजक्ता माळी आक्रमक
Prajakta Mali | बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी याबाबत बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी, सपना चौधरी आणि रश्मिका मंदाना यांची नावं घेतली. त्यानंतर आता अभिनेत्री प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश धस यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्राजक्ता माळी म्हणाली, की सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जी टिप्पणी केली, त्यासंदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी मी आले आहे. गेल्या दीड महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे. सगळं ट्रोलिंग, सगळ्या नकारात्मक कमेंट्सना मी सामोरी जात होते. पण माझी शांतता म्हणजे या सगळ्याला माझी मूक संमती नाहीये. माझ्यासारख्या अनेक महिला, कलाकार या सगळ्यांची ही हतबलता आहे. हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे आमच्यावर ओढवलं आहे. एक व्यक्ती रागाच्या भरात काहीतरी बरळून जाते. त्या दोन वाक्यांचे हजारो व्हिडीओ होतात. तेवढेच शब्द पकडले जातात. त्यावरून यूट्यूब चॅनल्सवर हजारो व्हिडीओ बनतात. मग एका सेलिब्रिटीला त्यावर विधान करायला भाग पाडलं जातं. मग समोरची व्यक्ती पुन्हा बोलते. ही चिखलफेक चालू राहते. महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचं मनोरंजन होतं.
ही गोष्ट धादांत खोटी आहे. एका सांस्कृतिक कार्यक्रमात सत्कार स्वीकारताना काढलेला एक फोटो, ती आमची एकमेव भेट. हे एका शब्दाचं एकमेव संभाषण… यावर एवढी आवई उठावी? त्याला मी काय प्रत्युत्तर देऊ? मी जेव्हा त्या गोष्टीवर भाष्य करते, तेव्हा १० लोकापर्यंतची गोष्ट हजार लोकांपर्यंत पोहोचते. ती गोष्ट खोटी असेल तर ती किती काळ टिकणार? म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं. शांत बसणं मी योग्य समजलं. पण आज मला स्पष्टीकरण देण्याची गरज पडावी ही नामुष्की आहे. कारण एक लोकप्रतिनिधी त्यावर टिप्पणी करतात. एखादी अफवा आहे. त्याविषयी जेव्हा लोकप्रतिनिधीआपल्यावर चिखलफेक करतात, तेव्हा ही गोष्ट गांभीर्याने घ्यावीशी मला वाटली, असं प्राजक्ता माळी म्हणाली.
हेही वाचा – मध्यमवर्गीयांना मिळणार आनंदाची बातमी, अर्थसंकल्पात मोदी सरकार देणार मोठा दिलासा
मी यावर कधीच बोलले नसते. पण काल त्यांनी ते वक्तव्य केल्यामुळे मला तुम्हा सगळ्यांसमोर यावं लागलं. लोकप्रतिनिधी खोटी गोष्ट त्यावर बोलून खरी आहे असं भासवतात, तेव्हा ही गंभीर बाब होते. माझा एक मूलभूत प्रश्न आहे सुरेश धसांना. तुम्ही एक राजकारणी आहात. आम्ही एक कलाकार आहोत. तुम्ही दुसऱ्या एका राजकाऱ्यावर टीका करताय. तुमचं जे काही चाललंय ते तुम्हाला लखलाभ. पण या सगळ्यात तुम्ही कलाकारांना का खेचता? आम्हा कलाकारांचा यात काय संबंध? बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. त्यावर भाष्य करताना कलाकारांवर गाडी का घसरते? असं प्राजक्ता माळी म्हणाली.
ते इव्हेंट मॅनेजमेंटविषयी काहीतरी सांगत होते. मान्य. पण मग महिला कलाकारांचीच का नावं येतात? परळीला कधी पुरुष कलाकारांची नावं येत नाहीत का हो? ज्या महिला अतिशय कष्टानं छोट्या कुटुंबातून येऊन संघर्षमय आयुष्य जगत मोठ्या होतात, आपलं नाव कमावतात, त्यांची प्रतिमा हे लोक असं बोलून डागाळतात? हे कितपत योग्य आहे? त्यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी महिला कलाकारांची नावं घेतली. त्या नावांचा गैरवापर केला. स्वत:चा टीआरपी वाढवण्यासाठी कुत्सितपणे टिप्पणी केली, असं प्राजक्ता माळी म्हणाली.
कलाकार म्हणून वेगवेगळ्या शहरांत जाणं, प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हे कलाकारांचं काम आहे. परळीच नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन मी काम केलं आहे. यापुढेही काम करत राहणार. याआधीही अनेक राजकीय नेत्यांबरोबर, मान्यवरांबरोबर फोटो आहेत. मग तो फोटोचा संदर्भ घेऊन तुम्ही कुणाहीबरोबर असंच नाव जोडणार का? हे एक महिला कलाकार म्हणून मला अतिशय निंदनीय वाटतं. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे कृत्य शोभत नाही. ते बोलले ते इतकं कुत्सित आहे. काय म्हणायचंय काय तुम्हाला? तुम्ही फक्त महिला कलाकारांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत नाही आहात. महिलांच्या कर्तृत्वावरही तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहात. कुठल्या राजकारण्यांच्या कुबड्यांशिवाय एखादी महिला स्वकर्तृत्वावर यशस्वी होऊ शकत नाही का? अशी टिप्पणी करून तुम्ही स्वत:ची मानसिकता दाखवत आहात. ही खेदजनक बाब आहे, असंही प्राजक्ता माळी म्हणाली.