ताज्या घडामोडी

नियती बडवते, अद्दल घडवते !

कुणी कितीही, काहीही म्हटले, तरी नियती नावाची अदृश्य शक्ती अस्तित्वात आहे, हे मान्य करावेच लागेल ! सगळेच मान्य करतात, फक्त या ना त्या स्वरूपात व्यक्त होतात.. कोणी याला ‘पेरलं ते उगवलं’ असं म्हणतात, तर कोणी ‘भोगा केलेल्या कर्माची फळं’ असं म्हणून वेळ मारून नेतात.

देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यात प्रचंड उलथापालथ झाली आणि त्या समुद्रमंथनातून जे काही बाहेर पडलं, ते वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सगळ्यांनाच आवक करणारं होतं. जे काही घडलं, त्यामुळं खऱ्या अर्थानं आत्ता नियती नावाच्या त्या अदृश्य शक्तीची आठवण झाली !

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या निवडणुका लक्षात घ्या. महाराष्ट्रात मतपेटीतून जो जनादेश आला, तो पाहून अनेक राजकीय दिग्गजांची मती नक्कीच गुंग झाली असणार. अनेकांचे सारे अंदाज मोडीत निघाले, काहींचे अंदाज सपशेल चुकीचे ठरले. काही राजकीय फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. काही जण अस्तंगत होण्याच्या उंबरठ्यावर कसे बसे धापा टाकत बचावले. काहींची दांडी उडाली, काही रन आउट झाले, तर अनेकांनी हाराकिरी पत्करून त्याचे खापर ईव्हीएम वर फोडले. अनेकांचा जीव कसाबसा वाचला, पण बोटं तुटली.. त्रयस्थासाठी खरोखर ही सगळी गंमत जंमत झाली. एक गोष्ट लक्षात आली का? नियती बडवते, काहींना सडवते, महत्त्वाचं दडवते, कुणाकुणाला लढवते, तर काहींना अद्दल घडवते !

महाराष्ट्रात जे घडलं, ते सारं इतकं अकल्पित, धक्कादायक, उलथापालथ करणारं होतं, की बुद्धी कितीही ताणली तरी नेमका निष्कर्ष हाती येत नाही, काही समीकरण मांडता येत नाही. हे का घडलं ? कसं घडलं ? नेमकं कोणी घडवलं ?
याचा नेमका सूत्रधार कोण ?.. बुद्धीला काही झेपतंच नाही !

चला उत्तरे शोधू या..

पण शेवटी कसं आहे, उत्तरं तर शोधलीच पाहिजेत ना! या प्रश्नांची उत्तरं शेवटच्या प्रश्नापासून पाहू या. हे नियतीने घडवले, असे ठामपणे म्हणता येईल. नियती नेहमीच अगदी सामान्य वाटेल, अशा माणसांना हाताशी धरून असे चमत्कार घडवत असते, हे माझं मत झालं आहे. जेव्हा लक्षावधी लोक नियतीच्या इच्छेने एकच विचार, एकाच तीव्रतेने पुनः पुन्हा करायला लागतात, त्यावेळी या ईश्वरी चेतनेने सारे वायूमंडल ती कंपने ग्रहण करते. पुढे ती प्रत्येकाच्या मनात संक्रमित होतात, असा बोध घ्यायला हरकत नाही. हे सारे डोळ्यांना दिसत नाही. कानाने ऐकू येत नाही. बुद्धीच्या कक्षेत येत नाही. स्पर्शाने अनुभवता येत नाही. त्याचे गंधज्ञान होत नाही. ते परिवर्तन थेट हृदयातून कृतीत उतरते. ज्याच्या कृतीतून उतरले, तो फक्त माध्यम असतो, हे सर्वात प्रथम लक्षात घ्या, म्हणजे नियती नावाचे कोडे काय आहे, याचा उलगडा होईल, आणि महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे सापडणे सोयीचे जाईल. यालाच त्सुनामी म्हणतात.

अंदमानचे बोलके उदाहरण

अंदमानच्या बाराटांग या बेटावर एक आदिम, आदिवासी जमात आहे. त्यांना जारवा म्हणतात. त्यांची एकूण संख्या पाचशे – सहाशे असावी. जेव्हा त्या भागात त्सुनामी आली. समुद्र खवळला.. उंचच्या उंच लाटा उसळल्या, चक्क सत्तर,ऐंशी फूट उंचीच्या लाटा उसळल्या, तेव्हा झालेल्या भयंकर जलप्रलयाने शेकडो पर्यटक समुद्राच्या पोटात गडप झाले. पण, एकही जारवा त्यात नाहीसा झाला नाही, बेपत्ता झाला नाही ! कारण त्यांना निसर्गाच्या वर्तनातील अनैतिक घडामोडींची लक्षणे त्सुनामी येण्यापूर्वी काही तास अगोदरच त्यांच्या उपजत प्रेरणांद्वारे समजली. ते जारवा सरळ उंच डोंगरावर जाऊन काय घडते, याचे निरीक्षण करीत शांत बसले. त्सुनामी आली, प्रचंड नुकसान आणि होत्याचं नव्हतं करून शांत झाली. मगच ते सारे जारवा त्यांच्या सामान्य जीवनक्रमाकडे पुन्हा वळले. हे सांगायचं कारण, की कोणत्याही उच्च शिक्षित मनुष्याला याचा अंदाजच आला नाही.

आठवतं का गोध्रा रेल्वे स्टेशनवर साबरमती एक्स्प्रेसमध्ये कारसेवकांना निर्घृणपणे जाळून मारण्याची दुर्बुद्धी काही समाजकंटकांना झाली. त्याचे परिणाम संपूर्ण भारतात आजही उमटत आहेत. सर्वत्र वणवा पेटला. देशातील सत्तेचा सारीपाट कायमचा बदलण्याची ती नांदी होती. त्यावेळी सर्व देशाने नरेंद्र मोदी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले, आज तेच नरेंद्र मोदी संपूर्ण देशावर, किंबहुना संपूर्ण जगावर सत्ता गाजवत आहेत.. गेली दहा वर्षे ! हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राएलमध्ये शिरून बाराशे निष्पापांच्या निर्घृण हत्या केल्या, तेव्हा रस्त्यावर येऊन जल्लोष करणारे, मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी करणारे जे होते, त्यापैकी किमान चाळीस हजार लोकांना नंतरच्या इस्राएलने केलेल्या हल्ल्यात या जगाचा निरोप घ्यावा लागला, हा इतिहास अगदी ताजा आहे, विचार करण्यासारखा आहे. किमान दोन,तीन लाख लोकांना घरे भस्मसात झाल्याने तंबूत आश्रय घ्यावा लागला..ते रोज मरत मरत जगत आहेत. त्यापेक्षा ते गेले वर्षभर काळरात्र अनुभवत आहेत, यालाच नियती म्हणत असावेत !

प्रभू श्रीरामाचे उदाहरण..

प्रभू श्रीरामांचे अस्तित्व नाकारणाऱ्यांचे उदाहरण बघा. नियतीने त्यांना तर राजकीयदृष्ट्या ‘राम नाम सत्य है !’ म्हणायला लावले.

माझ्या एका मित्राने एका रिक्षावाल्याला मतदान निश्चित कर, असं सांगितलं. त्यावर तो रिक्षावाला त्याला म्हणाला, मी रामरायासाठी मत देणार आहे. आपल्याला आता रामराज्य आणायचे आहे. मी माझ्या रिक्षातून जमेल तेवढ्या वयस्क लोकांना मतदानाला नेईन. माझ्या हातून थोडं तरी धर्माचं काम झालं पाहिजे. अशा उत्कटतेने जेव्हा एकेक मनुष्य कोणी सांगितले म्हणून, किंवा न सांगता ही स्वयंप्रेरणेने हे धर्मकार्य करतो, तेव्हा जे घडते, त्याचे परिणाम भूकंपासारखे घडून गेल्यावर जाणवतात. मग नंतर हिशोब मांडला जातो. कोणी कोणी काय काय गमावले? कुठे कुठे पडझड झाली ? त्याखाली किती जण गाडले गेले ? किती जण मुळापासून उखडले गेले, किती जण आयुष्यातून उठले ! जे कसेबसे बचावले, त्यांनी मात्र शांतपणे याचा विचार करावा, एवढीच अपेक्षा !

जे उसळलेल्या लाटांवर स्वार झाले, त्यांनीही याचे भान ठेवावे, की ज्या लाटांवर आपण स्वार झालो आहोत, त्या आपला तोल गेला, तर आपल्याला अशाच एका गाफील क्षणी कायमचं पोटात घेतील. हे सगळे जे घडत असते त्यालाच नियती म्हणतात !

थोडक्यात काय, तर नियती प्रचंड बलवान आहे. ती कितीही विरोध झाला, कट कारस्थाने झाली, तरी नरेंद्रजी मोदींना पदावर ठेवते. कितीही अंतर्गत विरोध असला, तरी इस्राएलच्या नेतान्याहूंच्या हातून युद्ध नेतृत्व करवते. अमेरिकेत ट्रम्पविरोधी कितीही मोहिमा राबवल्या, तरी ट्रम्प अमेरिकेत सत्तारूढ होणार असा निर्णय लागतो, ही सर्व उदाहरणे म्हणजे नियतीची ताकद आहे, ती स्पष्ट दिसत आहेत. भारताच्या सर्वनाशाची कामना गेली ७७ वर्षे रोज करणा-या पाकिस्तानला दिवाळखोरीच्या आणि चार तुकडे होण्याच्या अवस्थेत जावे लागते, यापेक्षा वेगळे उदाहरण काय असू शकते?

एका खुशाल चेंडू मनुष्याच्या हाती नेतृत्व दिल्याने युक्रेन होरपळून निघतो. अनेकांना होऊ नये ती दुर्बुद्धी होते, आणि मग नियतीच्या कराल दाढा त्यांचा घास घेतात. ही तर सुरुवात आहे. आपण अजून बरंच काही पाहणार आहोत, अनुभवणार आहोत, त्या सर्वांची किंमत मोजणार आहोत. सगळं शांत झाल्यावर विश्लेषणही करणार आहोत, स्वतःलाच पुन्हा पुन्हा विचारणार आहोत, की हे सारे घडेल, हे आपल्याला समजले कसे नाही ?

महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडले आणि देवेंद्र फडणवीस सारखे व्यक्तिमत्व मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, याचे बीज पाच वर्षांपूर्वी पेरले गेले आहे. ज्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी युती तोडून दोन्ही काँग्रेसच्या मांडीवर बसण्याचा निर्णय घेतला, त्याच दिवशी नियतीने ठरवून टाकले असावे की पुढचे मुख्यमंत्री हे फडणवीसच असतील. पुन्हा मुद्दा येतो ‘पेरले तेच उगवले !’.. नियतीने ‘महायुती’ च्या हातात पुन्हा सत्ता दिली, ती देखील प्रचंड बहुमताने..पाच वर्षांसाठी स्थिर सरकार मिळाले. सत्ताधारी फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना देखील माहित आहे, की व्यवस्थित वागलो नाही, तर हीच नियती पुढील वेळी फटके देणार आहे.. नको नको एवढे झटके देणार आहे !

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button