कर थकविणाऱ्या ७५ मिळकतींना टाळे, अठरा दिवसांत ४० कोटी रुपयांची वसुली

पुणे : शहरातील मिळकतकर वसुलीसाठी कर संकलन विभागाने थकबाकीदारांच्या दारात बॅंड वाजविण्यासह, मिळकती सील करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत मागील अठरा दिवसांत कर संकलन विभागाने तब्बल ७५ मिळकती सील करून ताब्यात घेतल्या आहेत. तर सुमारे ३१७ मिळकतधारकांकडून ४० कोटी ६८ लाख रूपयांचा कर वसूल करण्यात आला आहे.
कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी ही माहिती दिली. महापालिकेकडून सुमारे १४ लाख ८० हजार मिळकतधारकांना २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मिळकतकराची बिले पाठविण्यात आली आहेत. त्यातील ८ लाख ८४ हजार मिळकतधारकांंनी आतापर्यंत सुमारे १,८४१ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचा – ‘मराठी माणसावर हल्ला, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे’, संजय राऊतांची मागणी
तर उर्वरित सहा लाख मिळकतधारकांनी अद्यापही कर भरलेला नाही. त्याच वेळी या विभागास या वर्षीच्या अंदाजपत्रकात २,७२७ कोटींचे कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आर्थिक वर्षाचे शेवटचे तीन महिने शिल्लक असतानाच अद्यापही ८५० कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट अद्याप बाकी आहे.
त्यामुळे कर संकलन विभागाकडून शहरात आक्रमक भूमिका घेत मिळकतींच्या समोर बॅंड वाजविणे तसेच मिळकती सील करण्याची कारवाई सुरू केलेली आहे. त्यातून दिवसाला दोन ते अडीच कोटींची वसुली होत असल्याचे चित्र आहे.





