विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर टांगती तलवार

पिंपरी : आपले पाल्य सुरक्षितपणे शाळेत जावे यासाठी काही पालक स्कूलबसने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवितात; मात्र शहरातील अनेक स्कूल बसचालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आरटीओकडून करण्यात आलेल्या कारवाईतून आढळून येत आहे. त्यामुळे स्कूलबसमधून ये-जा करणार्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या तब्बल 282 दोषी स्कूल बसचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. गेल्या अकरा महिन्यांतील ही परिस्थिती असून, या कारवाईतून 39 लाख 21 हजार रुपयांचा दंड पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने वसूल केला आहे. अनेक स्कूल बसचालक विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या नियमांना न जुमानता ते धोकादायक पध्दतीने बस चालवत असल्याच्या तक्रारी दस्तुरखुद्द विद्यार्थीच त्यांच्या पालकांकडे करत आहेत.
हेही वाचा – ‘हो, मी नाराज आहे’; मंत्रिपद नाकारल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया
पिंपरी-चिंचवड शहर तसेच ग्रामीण भागात मिळून प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणी झालेल्या एकूण 2,957 स्कूल बसेस आहेत. तपासणी मोहिमेनंतर यातील 282 बसेसवर नियमभंगाचे आरोप सिद्ध झाले आहेत. याव्यतिरिक्त विनापरवाना, विनानोंदणीधारक इतर वाहनांमधूनही विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते आहे.
असे गंभीर नियमभंग होणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळणे होय. अशा प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनत आहे.कारवाईत 39 लाख 21 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून, या रकमेतून पुढील कारवायांसाठी काही सकारात्मक पावले उचलली जाण्याची अपेक्षा आहे.





