‘आम्ही गृहमंत्रिपदाचा आग्रह अद्यापही सोडलेला नाही’; शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

मुंबई | राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सरकार स्थापन होऊन जवळपास एक आठवडा होत आला. मात्र, अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहखात्यासाठी आग्रही असल्याचं बोललं जात आहे. मात्र भाजपाचा याला विरोध असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्याची कुजबूज आहे. यातच आता शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी मोठं भाष्य केलं आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, की मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात आम्ही सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले आहेत. तसेच जेव्हा महायुतीचे तिन्ही नेते एकत्र बसतील तेव्हा ठरवतील. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मात्र, तीन पक्ष असल्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी वेळ लागत आहे. आता शिवसेनेला किती खाते मिळतील? हे देखील आम्हाला माहिती नाही. याचा अर्थ असा आहे की आम्ही सर्व अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. त्यामुळे आता आमच्या पक्षाला किती मंत्रिपदे घ्यावी? कोणती खाते घ्यावे? हे सर्व एकनाथ शिंदे ठरवतील.
हेही वाचा – ‘उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर..’; भाजपा नेत्याचं खुलं आव्हान
शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याकडून अशी कोणतेही वक्तव्य नाही की आम्हाला एवढे खाते मिळतील? किंवा आम्हाला हे मंत्रिपद मिळेल. याचा अर्थ हा आहे की आमच्यामध्ये एक वाक्यता आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना गृहखातं मिळावं, यासाठी सर्वच आमदारांनी आग्रह केला होता. तसेच आम्ही गृहमंत्रिपदाचा आग्रह अद्यापही सोडलेला नाही. आम्ही गृहमंत्रिपदाचा आग्रह जरी धरलेला असला तरी यासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार हा एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
आम्हाला कोणतं मंत्रिपद मिळेल? काय मिळेल? याबाबत आम्ही कोणीच असं सांगितलं नाही की आम्हाला मंत्री करा. याचं कारण म्हणजे आमचा नेता दूरदृष्टीचा आहे. त्यांना सर्व गोष्टी कळतात. आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितलेलं आहे की तुम्ही निर्णय घ्या. मग तुम्ही जी जबाबदारी आमच्यावर द्याल ती आम्ही पार पडणार आहोत, असंही गुलाबराव पाटील म्हणाले.





