‘सर्व शेतमालाची खरेदी हमीभावाने’; केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान
![Union Agriculture Minister Shivraj Singh Chouhan said that the central government will purchase all agricultural products at the minimum support price.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/Shivraj-Singh-Chouhan-780x470.jpg)
नवी दिल्ली | केंद्र सरकार सर्व शेतमाल किमान हमीभावाला खरेदी करील, असे प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यसभेत शुक्रवारी केले. प्रश्नोत्तरांच्या तासात हमीभावावरील प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले.पंजाब-हरियाणा सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन पेटले असताना त्यांनी हमीभावाने शेतमाल खरेदीची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या आंदोलनातील हमीभाव ही मुख्य मागणी आहे.
केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले, शेतकऱ्यांचे सर्व उत्पादन किमान हमीभावाने खरेदी करण्यात येईल. हे मोदी सरकार असून, मोदींची गॅरंटी निभावण्याची ही हमी आहे. ज्या वेळी विरोधक सत्तेत होते, तेव्हा त्यांनी एम. एस. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी स्वीकारू शकत नाही, असे सांगितले होते. विशेष करून उत्पादन किमतीच्या ५० टक्के अधिक रक्कम देण्यास त्यांनी नकार दिला होता. पंतप्रधान मोदी यांनी २०१९ पासून उत्पादन किमतीवर ५० टक्के अधिक धरून किमान हमीभाव मोजण्याचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा – ‘५ जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावा’; शपथविधी होताच जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
मोदी सरकार शेतकऱ्यांना शेतमालाला चांगल्या किमती देत असल्याचा दावा त्यांनी केला. गहू, ज्वारी, सोयाबीन उत्पादन किमतीहून अधिक ५० टक्के रक्कम देऊन तीन वर्षांपासून खरेदी केले जात आहेत, असे शिवराजसिंह चौहान राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले.
किमान हमीभावाबद्दल माझ्या मनात सुस्पष्ट चित्र आहे. आम्ही शेतकऱ्यांना ५० टक्क्यांहून अधिक फायदा गृहीत धरून किमान हमीभाव ठरवू आणि शेतमाल खरेदीही करू, असंही शिवराजसिंह चौहान म्हणाले.