Political Analysis : सहानुभूती… अँटी इनकम्पन्सी तरीही डॉ. सुलक्षणा शिलवंत यांचा पराभव का?
पिंपरी विधानसभा मतदार संघात योगेश बहल ‘किंगमेकर’ : निवडणूक ‘मॅनेजमेंट’ जमले नाही, कार्यकर्त्यांचा अभाव
![Political Analysis: Sympathy... Anti-incumbency, yet why did Dr. Sulakshana Shilwant lose?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/Political-Analysis-Sympathy...-Anti-incumbency-yet-why-did-Dr.-Sulakshana-Shilwant-lose-780x470.jpg)
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते शरद पवार यांचा अपेक्षीत करिष्मा, मागीलवेळी ऐनवेळी तिकीट कापल्याची सहानुभूती आणि आमदार अण्णा बनसोडे यांच्यावरील मतदारसंघातील नाराजीचा फायदा होईल? या गृहतीकांवर विसंबून राहिल्यानेच पिंपरी विधानसभेत डॉ. सुलक्षणा शिलवंत-धर यांना विधानसभेच्या पहिल्याच निवडणुकीत पिंपरीत अपयश आले. उच्चशिक्षित असलेल्या धर यांना पराभवाचा सामना करावा लागला.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूंच्या परिसराचा समावेश असलेला पिंपरी विधानसभा मतदारसंघ संमिश्र लोकवस्तीचा आहे. अनुसूचित जाती (एससी) साठी राखीव असलेल्या या मतदारसंघाची २००९ मध्ये निर्मिती झाली. तेव्हापासून झालेल्या तीन निवडणुकांमध्ये दोनदा राष्ट्रवादी आणि एकदा शिवसेनेने बाजी मारली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शहरातील केवळ पिंपरीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली. दोन्ही राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केलेली लढाई सुरुवातीला चुरशीची होईल अशी वाटत असताना ही लढत अगदीच एकतर्फी झाली.
पिंपरीत २,०४,००५ पुरूष तर १,८७,५६८ महिला आणि इतर ३४ असे ३,९१,६०७ मतदार आहेत. यापैकी १,०५,३९७ पुरूष, ९७,३६० महिला तर इतर नऊ अशा २,०२, ७६६ मतदारांनी ५१.७८ टक्के मतदान केले होते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांना १,०९,२३९ मते मिळाली. तर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सुलक्षणा शिलवंत-धर यांना ७२,५७५ मते मिळाली. बनसोडे यांनी धर यांचा ३६,६६४ मतांनी पराभव केला. बनसोडे तिसऱ्यांदा विजयी झाले असून त्यांचे यावेळेसचे मताधिक्य पहिल्या दोन निवडणुकीपेक्षा जास्त आहे.
पक्षाकडून पाठबळ पण, व्यवस्थापन चुकले..!
२०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून सुलक्षणा शीलवंत-धर यांना तिकीट देण्यात आले होते. मात्र, अचानक अजित पवार यांनी बनसोडे यांना तिकीट देऊन उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले. दरम्यान, धर यांना थांबविण्यात आले. पक्षातील फुटीनंतर धर या पहिल्यापासून शरद पवार यांच्यासोबत ठाम राहिल्या. निष्ठेचे फळ म्हणून अनेक जण इच्छुक असताना पक्षाने धर यांना उमेदवारी दिली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आग्रहाने धर यांना उमेदवारी दिली. प्रचारालाही आले. पक्षाने पाठबळही दिले मात्र प्रचारात कमतरता राहिली. निवडणूक व्यवस्थापन प्रभावीपणे करता आले नाही.
‘ॲन्टीइन्कम्पन्सी’चा फायदा घेत आला नाही…
पिंपरी मतदार संघात आमदार आण्णा बनसोडे यांची ‘ॲन्टीइन्कम्पन्सी’ होती. मात्र, त्याचा राजकीय फायदा शीलवंत यांना घेता आला नाही. आमदार अण्णा बनसोडे हे निवडणुकीनंतर पाच वर्षे मतदारांना भेटत नसल्याने त्यांच्याबाबत काही प्रमाणात नाराजी होती. अकार्यक्षम आमदार म्हणून अण्णा बनसोडे यांना टार्गेट केले. मागील पाच वर्षात आमदार मतदारसंघात दिसले नाहीत. त्यांनी केलेली ठळक कामे मतदार संघात दिसत नाहीत. ते अशिक्षित आहेत. अशा अनेक आरोपांनी बनसोडे यांना घेरले. बनसोडे यांना प्रश्न विचारणारे निनावी फलकही मतदारसंघात झळकावले. परंतु, त्यांच्यावरील नाराजीचे मतात रूपांतर करण्यात धर यांना अपयश आले. दुसरीकडे, आमदार बनसोडे यांनी आरोपाला उत्तर न देता ‘मायक्रोप्लॅनिंग’ करत निवडणुकीची रणनीती आखली. त्यामुळे मागील दोन निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्याने विजय खेचून आणला.
झोपडपट्टी भागाकडे दुर्लक्ष झाले…
पिंपरी मतदार संघात झाेपडपट्टी बहुल भाग सर्वाधिक आहे. तर, निगडी, प्राधिकरण, आकुर्डी सारखा मध्यम आणि उच्चभ्रू परिसरही या मतदारसंघात आहे. धर यांच्याकडून बनसोडे यांच्या कमी शिक्षणाचा मुद्दा प्रचारात आणला गेला मात्र, हा मुद्दा निष्प्रभ ठरला. भाजपचा हक्काचा मानला जाणारा उच्चभ्रू मतदार महायुतीसोबत कायम राहिला. तर, झोपडपट्टीबहुल भागात बनसोडे यांची जादू चालली. मतदारसंघात एकूण 28 झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये बनसोडे यांची चांगली क्रेझ आहे. इथल्या लोकांशी बनसोडे यांचा वैयक्तिक संबंध आहेत. मतदार संघातील झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे एक लाख मतदान आहे. त्यातील बहुतांश मतदान बनसोडे यांना मिळाले. ‘लक्ष्मीदर्शन’ हा मुद्दा वेगळ्या अर्थाने चर्चेत आला.
महाविकास ‘आघाडी’ दिसली नाही…
पिंपरीत आरपीआयने महायुतीचा धर्म पाळला आणि आण्णा बनसोडे यांचे काम केले. पण, दुसरीकडे महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेस कुठेच दिसली नाही. किंबहुना, नाराज गटाने अप्रत्यक्ष आण्णा बनसोडे यांना मदत केली. निगडी प्राधिकरण हा उच्चभ्रू लोकवस्तीचा भाग पिंपरी विधानसभा मतदारसंघात येतो. त्यासह शाहूनगर, संभाजीनगर हा परिसर देखील पिंपरी विधानसभा मतदारसंघात आहे. यासह शहराच्या विविध भागात भाजपची चांगली ताकद आहे. भाजपचे संघटन शक्ती आणि प्रचार कौशल्य या भागामध्ये मताधिक्य वाढविण्यासाठी कामी आले.
योगेश बहल यांनी ‘बदला’ घेतला…
अण्णा बनसोडे यांना तिकीट देण्यापासून पक्षांतर्गत विरोध झाला. बनसोडे यांच्या उमेदवारीबाबत शहराध्यक्ष योगेश बहल यांनीच सुरुवातीला विरोधी सूर आवळला. बनसोडे उमेदवार असतील तर आपण पक्षाचे काम करणार नाही अशी भूमिका मित्र पक्षाचे माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, चंद्रकांता सोनकांबळे, काळूराम पवार, नारायण बहिरवाडे यांनी घेतली होती. मात्र हा महायुती अंतर्गतचा कलह शांत करण्यात बनसोडे यांना यश आले. शहराध्यक्ष योगेश बहल यांनी पक्षातील कार्यकर्त्यांची व्यवस्थित मोट बांधली. काही नाराज पदाधिकाऱ्यांना थेट अजित पवार यांच्याकडे घेऊन जात त्यांची नाराजी दूर करण्यात आली. त्याचा फायदा बनसोडे यांना झाला. बहल आणि शिलवंत यांच्या राजकीय संघर्ष सर्वश्रृत आहे. त्यामुळे बहल यांनी या निवडणुकीत अक्षरश: ‘बदला’ घेण्याच्या भूमिकेत काम केले.
व्यापाऱ्यांच्या नाराजीचा फायदा घेण्यात अपयश!
पिंपरी कॅम्प परिसरात सिंधी बांधव आणि व्यापाऱ्यांमध्ये माजी उपमहापौर डब्बू आसवानी, उद्योजक श्री आसवानी यांची मोठी ताकद आहे. आसवानी बंधू, व्यापाऱ्यांमध्ये बनसोडे यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रचंड नाराजी होती. या नाराजीचा फायदा घेण्याची मोठी संधी धर यांनी घालविली. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात डब्बू आसवानी यांची नाराजी दूर करण्यात महायुतीला यश आले. आसवानी यांनी साथ दिल्याने कॅम्प मधील सिंधी बांधव आणि व्यापारी अण्णांच्या बाजूने उभे राहिल्याचे आकडेवारीतून दिसते. योगेश बहल यांनी शिष्टाई केली आणि व्यापाऱ्यांची ताकद बनसोडेंच्या बाजुने वळवली.
उमेदवारी उशिरा जाहीर झाल्याचा फटका?
महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या सुलक्षणा शीलवंत धर यांना शेवटच्या टप्प्यात तिकीट जाहीर झाल्याने प्रचारासाठी फार कमी वेळ मिळाला. झोपडपट्ट्यांमधील मतदारांपर्यंत त्या पोहोचू शकल्या नाहीत. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याने ताकद विभागली गेली. बहुतांश मातब्बर नेतेमंडळी अजित पवार गटात सहभागी झाले. त्यामुळे आपसूक शरद पवार गटाची ताकद कमी झाली. सोबतीला असलेल्या ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, काँग्रेसला शहरात आपला करिष्मा दाखवता आलेला नाही. त्यामुळे सुलक्षणा शीलवंत धर यांना एकूणच महाविकास आघाडीची ताकद कमी मिळाली.
शहराध्यक्ष तुषार कामठे यांची एकाकी झुंज…
पक्ष फुटीनंतर तुषार कामठे आणि सुलक्षणा धर हे दोन माजी नगरसेवक शरद पवार यांच्यासोबत ठाम राहिले. लोकसभेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. त्यामुळे शहरातील पदाधिकारी हुरळून गेले. संघर्षाच्या काळात सोबत राहिल्याने कामठे, धर यांचे पक्षात महत्व वाढले. त्यातून ‘मी’ पणा निर्माण झाला. परिणामी, सुरुवातीला सोबत असलेले अनेकजण दुरावले. शहराध्यक्ष कामठे, धर आणि युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर असे पक्षात दोन गट पडले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शहरातील तिन्ही म्हणजेच पिंपरी, चिंचवड, भोसरी मतदारसंघात निवडणूक लढवत होता. शहराध्यक्ष म्हणून कामठे यांनी तिन्ही मतदारसंघात प्रचार करणे अपेक्षित असताना त्यांनी मात्र पिंपरीतच ठाण मांडले. प्रचाराची सूत्रे आपल्या हाती घेतली. परंतु, नियोजनात कामठे एकाकी लढले, महाविकास आघाडी वज्रमूठ खऱ्या अर्थाने झाली नाही.