‘निवडणुकीची तुलना धर्म युद्धाशी नको’; स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचा व्होट जिहाद शब्दाचा विरोध

Swami Govinddev Giri Maharaj | राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख दोन दिवसांवर आली आहे. निवडणुकीचा प्रचारही शेवटच्या टप्प्यात आहे. असा स्थितीत महाराष्ट्राच्या निवडणुकीत व्होट जिहादचा मुद्दा जोरात मांडला जात आहे. तसेच सज्जाद नोमानी यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला एक व्हिडीओ भाजपाकडून दाखवला जात आहे. या व्हिडीओवरून देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. आता श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनीही व्होट जिहादवर प्रतिक्रिया दिली आहे.
स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले, राजकीय लढतींना व्होट जिहाद म्हणणे चुकीचे ठरेल. कुणाला मतदान करावे, हे सांगण्यासाठी पूर्वी धार्मिक स्थळावरून पत्रक काढले जात होते. पण आता व्होट जिहादसारख्या घोषणा खुलेआम होत आहेत. हिंदू समाजाने न घाबरता याचा पूर्ण ताकदीनिशी मुकाबला केला पाहीजे. खरा हिंदू हा मानवतेचा पाईक असतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करत सर्वांशी समान व्यवहार केला पाहीजे. तसेच अन्यायही कधीच सहन करू नये.
हेही वाचा – ‘खासदार व्हायला गेले आणि आमदार झाले’; पंकजा मुंडेंचं मिश्किल वक्तव्य
सज्जाद नोमानी व्हिडीओत काय म्हणाले?
सज्जाद नोमानी यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर सदर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. १६ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये सज्जाद नोमानी यांनी मुस्लीम समाजाला योग्य मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणतात, मी हे निश्चित सांगू शकतो की, महाराष्ट्राच्या निवडणुकीला आता मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. जर इथे हरियाणाप्रमाणेच त्यांचा (भाजपा) विजय झाला तर त्यांचा आत्मविश्वास आणखी मजबूत होईल. त्यानंतर दिल्ली सरकार नव्या आत्मविश्वासाने आपल्या वाईट हेतूंच्या दिशेने मार्गक्रमण करेल. जर महाराष्ट्रात त्यांचा (भाजपाचा) पराभव झाला, दिल्लीमधले त्यांचे सरकार अधिक काळ टीकू शकणार नाही. त्यामुळे आपल्या निशाण्यावर फक्त महाराष्ट्राचे सरकार नाही, तर दिल्लीही आहे.





