‘प्रतिमा बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास बूमरँग होतो’; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/राज-ठाकरे-13-780x470.jpg)
पुणे : पुणेकर नेहमीच विकासाला आणि भविष्याला मत देतात. कुणी प्रतिमा बदनाम करण्याचा प्रयत्न केल्यास तो बूमरँग होतो. सुनील टिंगरे यांनी मागील पाच वर्षांत केलेली विकासकामे हीच तुमच्यासमोर असून, उमेदवार सुनील टिंगरे शंभर टक्के निवडून येणार आहेत. तुम्ही त्यांना एक लाखाच्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुरलीधर मोहोळ बोलत होते. या वेळी माजी आमदार जगदीश मुळीक, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, की लोहगाव विमानतळाला जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याचा लोकसभा निवडणुकीवेळी लोहगावकरांना दिलेला शब्द मी पाळला आहे. केंद्रात त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल. राज्यात महायुतीचे नेते एकदिलाने काम करीत आहेत.
हेही वाचा – आता देशमुखांचे बेणे हटवा, अर्चना ताईंना आमदार करा!
महायुतीचा धर्म पाळून आमदार टिंगरे यांना निवडून देण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील. विरोधकांकडे बोलण्यासाठी काहीच नसल्याने वैयक्तिक टीका केली जात आहे. पदाधिकार्यांनी मनात किंतु- परंतु न ठेवता काम करायचे आहे. तुम्ही एका अण्णांना लोकसभेत पाठवले आहे. आता दुसर्या अण्णांना विधानसभेत निवडून द्यावे, असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले.
मतदारसंघात केलेल्या पंधराशे कोटींच्या विकासकामांचा हिशोब मी माझ्या कार्यअहवालातून मांडला आहे. टीका करणार्यांनीही स्वतःच्या कामांचा लेखाजोखा मांडावा.आमदार असलो, तरी लोहगावसाठी मी नगरसेवक बनून कामे केली आहेत. माझ्या निधीतील सुमारे ७० टक्के निधी लोहगावला दिला असल्याचेही आमदार सुनील टिंगरे या वेळी म्हणाले.