‘पर्वतीत सायबर पोलीस स्टेशन उभारणार’; आमदार माधुरी मिसाळ

पुणे : नागरिकांचे आर्थिक व्यवहार हे बहुतांशी ऑनलाइन पद्धतीकडे वळल्यानंतर चोरट्यांनी त्यांचा मोर्चा ऑनलाइन गुन्हेगारीकडे वळविल्याचे दिसून येते. शहरात दिवसाकाठी सायबर गुन्ह्याचे ७० ते ८० तक्रार अर्ज दाखल होतात. गंभीर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्हे दुप्पट झाले असल्याने सायबर पोलीस ठाण्यावर मोठा ताण येतो.
सायबर गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी पर्वती विधानसभा मतदारसंघात सायबर पोलीस स्टेशन उभारणार असल्याची माहिती पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार माधुरी मिसाळ यांनी दिली.
माधुरी मिसाळ यांच्या प्रचारार्थ सॅलिसबरी पार्क परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, कविता वैरागे, राजश्री शिळिमकर, प्रवीण चोरबोले, डॉ. भरत वैरागे, बंटी मोकळ, देवेंद्र बनसोडे, सुनील इंगळे, प्रसन्न वैरागे, निखिल शिळिमकर, उमेश शहा, सिद्धार्थ चिंचोळकर, किरण रामसिन्हा, राजेंद्र सरदेशपांडे, गणपत मेहता, पूजा जोशी, संगीता कांबळे, वंदना गावडे, रेणुका पाठक,अनिल भन्साळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा – शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तोफ धडाडणार
माधुरी मिसाळ म्हणाल्या, की वाढत्या तंत्रज्ञानाबरोबर गुन्हेगारांच्या नवनवीन क्लृप्त्या पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत. गंभीर गुन्हे हाताळण्यासाठी ३० पोलीस ठाणी आणि संपूर्ण गुन्हे शाखा काम करते. मात्र, गंभीर गुन्ह्यांपेक्षा सायबर गुन्ह्यांची संख्या दुप्पट असूनही त्याचा ताण केवळ एकाच पोलीस ठाण्यावर येत आहे. या पोलीस ठाण्यात कुशल मनुष्यबळाची गरज आहे.
तक्रार अर्जांची संख्या लक्षात घेता, प्रत्येक गुन्ह्याचा तपास करणे शक्य होत नाही. त्यामुळे पर्वतीत सायबर पोलीस ठाणे उभारून प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहोत, तसेच पर्वती मतदारसंघात सिंहगड रस्ता आणि बिबवेवाडी परिसरात प्रत्येकी एक पोलीस स्टेशन व पोलीस चौकी उभारण्यात आली. या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देता आले असल्याने गुन्हे घटले आहेत.




