‘जुन्या वाड्यांचा प्रश्न कायमचा निकाली काढणार’; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : जुन्या वाड्यांचा पुनर्विकास करण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याबाबत एक आदेश काढला असून सत्तेत आल्यानंतर सहा मीटर रस्त्यांच्या बाजूला बांधकामांसाठी परवानगीबाबत मार्ग काढू. यातून वाड्यांच्या पुनर्विकासाला गती देऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप-महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ शनिपार येथे आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी रासने यांच्या कामाचे कौतूक करत काॅंग्रेस- महाविकास आघाडीचे उमेदवार तथा आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कामाच्या पद्धतीवर खोचक शब्दांत टीका केली.
यावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश महामंत्री राजेश पांडे, उमेदवार हेमंत रासने, राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, जगदीश मुळीक, संजय सोनवणे, स्वरदा बापट, कुणाल टिळक, गौरव बापट, संदीप खर्डेकर, अजय खेडेकर, मनीषा लडकत, उदय लेले उपस्थित होते.
हेही वाचा – शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तोफ धडाडणार
फडणवीस म्हणाले, “कसबा मतदारसंघात भाजप-महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचे कौतुक केले पाहिजे. कारण, त्यांनी जनतेचे समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा केला आहे. देशात एक अपघाती मुख्यमंत्री चित्रपट तयार झाला होता. तशाच प्रकारे याठिकाणी विरोधी पक्षाचा एक अपघाती आमदार पोटनिवडणुकीत विजयी झाला. मात्र, पराभव झाल्यावर घरी नैराश्याने न बसता दुसऱ्या दिवसापासून जनतेत जाऊन रासने यांनी काम सुरू केले.
महापालिकेत नगरसेवक नसल्याने नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी स्वत: रासने यांनी मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या समस्या सोडविल्या आहेत. कसबा मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून ते आता आमदार होतील, अस विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.





