‘भ्रष्टाचार करणाऱ्यांना प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे’; जयंत पाटील यांचे विधान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/In-Pimpri-Chinchwad-the-anger-of-the-Varkari-community-over-Ajit-Gavan-of-Mahavikas-Aghadi-13-780x470.jpg)
पिंपरी : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही महायुती सरकारने भ्रष्टाचार केला आहे. तकलादू साहित्य वापरल्याने अवघ्या आठ महिन्यांत मालवण येथील महाराजांचा पुतळा काेसळला. या सरकारला त्याचे प्रायश्चित्त मिळालेच पाहिजे,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे, अजित गव्हाणे यांच्या प्रचारासाठी मंगळवारी (१२ नोव्हेंबर) पाटील यांची रहाटणी, चिखलीत सभा झाली. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख, माजी आमदार गाैतम चाबुकस्वार, विलास लांडे, शहराध्यक्ष तुषार कामठे या वेळी उपस्थित हाेते.
तळेगाव दाभाडेत येणारा वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेला. हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापेक्षा मोठा प्रकल्प येईल, असे सभागृहात सांगितले. त्यांची मुदत संपत आली, तरी एकही प्रकल्प राज्यात आला नाही. त्यांना मुख्यमंत्रिपद दिले. पण, त्यांच्यावर अनेक बाबतींत टांगती तलवार आहे. त्यामुळे ते काही करू शकत नाहीत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रापेक्षा गुजरात राज्य पुढे गेले आहे. राज्याची अधाेगती थांबविण्यासाठी हे सरकार बदलले पाहिजे. भाजपचा नाकर्तेपणा, व्यवस्थापनाचा अभाव यामुळे महागाई, बेराेजगारी प्रचंड वाढली आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच रुपयांची किंमत माेठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
हेही वाचा – ‘चुकीला माफी होऊ शकते, पण गद्दारीला माफी नाही’; खासदार अमोल कोल्हेंची टीका
एक डाॅलर खरेदी करण्यासाठी ८४ रुपये ३३ पैसे खर्च करावे लागत असल्याचे पाटील म्हणाले. पिंपरी महापालिकेतील प्रत्येक कामात भ्रष्टाचार हाेत आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराचा वाटा मिळविणे हा शहरातील आमदारांचा धंदा बनला आहे. कंत्राट काेणाला द्यायचे, हे वरून ठरविले जाते. शहर पैसे खाण्याचे कुरण झाले आहे. महापालिकेतील पैशांच्या जाेरावर सत्ताधारी माज करत आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरवावी, असे आवाहन पाटील यांनी केले.
शरद पवार यांच्या दूरदृष्टीने पिंपरी-चिंचवड शहर नावारूपाला आले. शहराचा लौकिक राज्यभर निर्माण झाला. शहर वाढत गेले, शहरातील समस्या देखील वाढत होत्या. मात्र पवार साहेबांच्या दूरदृष्टीने आणि येथील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या कामातून या शहरातल्या समस्या देखील सोडवण्यात आल्या. मात्र गेल्या दहा वर्षात शहराची पुरती वाट लागली आहे. शहराच्या दोन भागात वाटण्या करून या शहराला वाटून खाल्ले आहे. ज्यांना आपण विधानसभेत पाठवले त्यांच्या शरीरात अपप्रवृत्ती शिरली. पैसे कसे मिळवायचे हे त्यांना समजले आणि त्यातूनच शहराचा नावलौकिक मलीन करण्याचे काम केले गेले, असा आरोपही त्यांनी केला.