साहेब, निर्धास्तपणे राज्यात फिरा…मतदारसंघाची अजिबात चिंता नको, आम्ही आपला हा गड लढविण्यास समर्थ!
गावोगावचे मतदार व कार्यकर्त्यांची आमदार जयंत पाटील यांना ग्वाही
![Don't worry about the constituency at all; Testimony of activists to MLA Jayant Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Jayant-Patil-780x470.jpg)
सांगली | साहेब,तुम्ही मतदारसंघाची अजिबात चिंता करू नका. आम्ही आपला हा गड लढविण्यास समर्थ आहोत. कोणीबी येवू द्या आणि कितीबी येवू द्या आमच्यावर फरक पडत नाही. तुम्ही निर्धास्तपणे राज्यात फिरा आणि गुजरातधार्जिण्य, जातीयवादी भाजपा युतीचे सरकार खाली खेचा, अशा भावना गावोगावचे मतदार व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जयंत पाटील यांच्यासमोर व्यक्त केल्या. कार्यकर्ते व मतदारांनी जयंत पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले, तर माता-भगिनींनी त्यांचे औक्षण करून त्यांना आशिर्वाद दिले.
आमदार जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकारणातून थोडीशी उसंत मिळताच आपल्या मतदारसंघातील गोटखिंडी, बावची, पोखर्णी, नागाव, भडकंबे, तुजारपूर, गाताडवाडी, अहिरवाडी, पडवळवाडी, माळवाडी, सावळवाडी, नवेखेड, जुनेखेड, मसूचीवाडी, मिरजवाडी, दुधारी, भवानीनगर, कि.म.गड, नरसिंहपूर, शिरटे आदी गावांना भेटी देऊन कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गावा-गावातील प्रचार कामाचा आढावाही घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,नेर्ल्याचे लोकनियुक्त सरपंच संजय पाटील त्यांच्या समवेत होते.
हेही वाचा – ‘पुन्हा महायुतीचाच मुख्यमंत्री होण्यासाठी सुनील शेळके यांना मतदान करा’; संतोष दाभाडे
जयंत पाटील म्हणाले, माझा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मला मतदारसंघाची कोणतीही चिंता नाही. आपले घड्याळ चिन्ह चोरीला गेले आहे. आपले नवे चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस हे आहे. हे चिन्ह घरा-घरापर्यंत पोचवा. आपण गेल्या ५ वर्षात व त्यापूर्वीही केलेली विकासकामे आपल्या समोर आहेत. आपण बुथवर लक्ष केंद्रीत करा. प्रत्येकाने घरे वाटून घेत प्रत्येक मतदारापर्यंत पोचा. आपण आपल्या पक्षाच्या वतीने राज्यात ८७ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभा केले आहेत. या सर्व मतदार संघात मला जावे लागणार आहे. वेळ कमी आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकदिलाने प्रचाराची धुरा सांभाळा.
कार्यकर्त्यांत प्रचंड उत्साह, युवक,महिलांची लक्षणीय उपस्थिती
गेल्या महिन्यात इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा मुसळधार पावसानंतरही जोरदार सांगता सभा झाली आणि त्यानंतर लगेच आ.पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यास आणि जाहीर सभेस रेकॉर्ड ब्रेक गर्दी जमली होती. त्यानंतर आ.पाटील यांनी गावांना भेटी दिल्या आहेत. यावेळी कार्यकर्ते व मतदारामध्ये प्रचंड उत्साह होता. युवक व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.