‘सुनील टिंगरेंकडून शरद पवारांना नोटीस’; सुप्रिया सुळेंचा दावा

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने वडगाव शेरी या मतदारसंघातून बापू पठारे यांना उमेदवारी दिली आहे. शुक्रवारी (८ नोव्हेंबर) खासदार सुप्रिया सुळेंनी पठारे यांच्या प्रचारासाठी वडगाव शेरी मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणावरून एक मोठा गौप्यस्फोट केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, की तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या ८० वर्षाच्या योद्ध्याबद्दल ते (सुनील टिंगरे) आपल्या भाषणात (यापूर्वीच्या निवडणुकीत) बोलत होते. ज्यांनी तुमच्या एबी फॉर्मवर सही केली होती, ज्यांच्यामुळे तुम्ही निवडून आलात, त्याच शरद पवारांना तुम्ही पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर नोटीस पाठवली होती. ‘माझी बदनामी केली तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन’ असं त्या व्यक्तीने (सुनील टिंगरे) शरद पवारांना नोटीसीद्वारे बजावलं होतं. तशी नोटीस त्यांनी पाठवली होती. तुम्ही माझी बदनामी केली तर मी तुम्हाला कोर्टात खेचेन असं त्यात त्यांनी म्हटलं होतं.
हेही वाचा – ‘आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मोफत देण्यासाठी मी कटीबद्ध’; राहुल कलाटे
मी एकदा नाही, पुन्हा पुन्हा आणि शंभर वेळा तुम्हाला आव्हान देते, तुम्ही म्हणाल ती वेळ, तुम्ही म्हणाल ती जागा, मी त्या पोर्शे कार अपघात प्रकरणात हत्या झालेल्या मुलांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि तुम्ही ती कृती करणाऱ्या (अपघातातील आरोपी) व्यक्तीच्या पाठीशी उभे होतात, हे सर्वांना माहीत आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे (शिवसेना उबाठा उपनेत्या) आणि आमदार रवींद्र धंगेकर (काँग्रेस नेते) यांना नोटीस पाठवून दाखवा. आम्ही लढू, कारण आम्हाला कोणाची भीती नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.





