मोठी बातमी! राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली

Rashmi Shukla | राज्यात विधानसभा निवडणूक होत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. विरोधकांकडून वारंवार रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली जात होती. असं असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातले आदेश जारी केले असून त्यांना तातडीने पदरचनेतील त्यांच्यानंतरच्या सर्वात वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार सोपवण्याचे आदेश देण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत. यानंतर मुख्य सचिवांनीदेखील तीन वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पॅनला नव्या पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा – अर्ज मागे घेतले नाही तर पक्षाचे दरवाजे बंद; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी काँग्रेसने केली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्या प्रकरणी गुन्हे दाखल होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली. शुक्ला यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी पटोले यांनी पत्र लिहित निवडणूक आयोगाला केली. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.





