‘लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असं मतदारांनी ठरवलं होतं’; अजित पवारांचं विधान
![Ajit Pawar said that the voters had decided that he would be Tai for the Lok Sabha and Dada for the Vidhan Sabha](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/Ajit-Pawar-780x470.jpg)
पुणे | बारामतीत लोकसभेला राज्याने नणंद भावजयीमधील लढत पाहिली तर विधानसभेला काका-पुतण्यामधील लढत पाहायला मिळतेय. अजित पवारांविरोधात त्यांचाच सख्खा पुतण्या युगेंद्र पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, यावरून अजित पवार यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे.
अजित पवार म्हणाले, की काहींनी ठरवलं होतं की लोकसभेला ताईंना निवडून द्यायचं आणि विधानसभेला दादाला. त्याबद्दल जास्त बोलणार नाही. परंतु मागच्या वेळी पहिल्या नंबरच्या मताधिक्क्याने पाठवलं. त्यामुळे मी पहिल्या नंबरचा निधी आणला. बारामतीत ९ हजार कोटी निधी देण्याचं काम केलं. यावेळीही विधानसभेत चांगल्या मताधिक्क्यांने संधी द्या, असं आवाहन त्यांनी केलं.
हेही वाचा – निवडणूक निरीक्षकांची माध्यम कक्षाला भेट
आज मी तुमच्या नाही, माझ्या कामाकरता आलोय. माझी विनंती आहे की मी पाच वर्षे तुमची कामं करतोय, आता तुम्ही माझं काम करा. तुम्ही मला साथ द्या. मी पुढे पाच वर्षे तुमची कामं करण्यासाठी बांधिल आहे, असंही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभा निवडणुकीत शह देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीत गाठीभेटींना सुरुवात केली आहे. अजित पवारांनीही निवडणुकीसाठी यंत्रणा कामाला लावली असून, दोन्ही पवारांचा दिवाळीचे सलग चार दिवस बारामतीतच मुक्काम असणार आहे.