‘राज ठाकरेंचा भोंगा उतरवण्याचं काम वंचितचे कार्यकर्ते करतील’; सुजात आंबेडकरांची टीका

Sujat Ambedkar | महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यानिमित्त वंचितने प्रचारदौरे आणि सभा घेण्यास सुरूवात केली आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे सुपूत्र सुजात आंबेडकर उमेदवार मेघा डोंगरे यांच्या प्रचारासाठी वाशिममध्ये गेले होते. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
सुजात आंबेडकर म्हणाले, मुस्लिमांसाठी फक्त वंचित बहुजन आघाडी लढते. ते म्हणतात आम्ही मोठमोठे स्पीकर लावू. भोंगे लावून त्यावर हनुमान चालिसा वाजवू. मात्र, त्याला विरोध करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भोंगा उतरवण्याचं काम सर्वांत आधी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतील. जोपर्यंत मुस्लिमांचे चार-पाच आमदार निवडून येत नाहीत, तोपर्यंत त्यांच भलं होणार नाही.
हेही वाचा – सलमान माफी का मागेल? त्याने काय गुन्हा केला; सलीम खान यांची प्रतिक्रिया
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रस्थापित नेते आमचा विकास करू शकणार नाहीत. आमची फक्त एकच मागणी असली पाहिजे की १५ टक्के मुस्लीम समाज महाराष्ट्रात आहे आणि जो पक्ष १५ टक्के त्यांना भागीदारी देईल, १५ टक्के उमेदवारी देईल, त्यांनाच मतदान करून आपल्याला विजय करायचा आहे, असं सुजात आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, वाशिम जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशी लढत होणार आहे. त्यामुळे जनता कोणाच्या बाजूने कौल देतेय हे पाहावं लागेल.




