आचारसंहितेचा भंग केल्यास सहपोलीस आयुक्तांकडून कारवाईचा इशारा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Vilas-Lande-9-780x470.jpg)
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी प्रचार फेरीत दहांपेक्षा अधिक वाहने वापरण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच दोन ताफ्यातील अंतर दोनशे मीटर आणि पंधरा मिनिटांचे असावे, असे आदेश पुणे पोलिसांकडून देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी कळविले आहे.
विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्याअनुषंगाने पुणे पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शिरुर, पुरंदर, भोर, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरुड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोंमेंट आणि कसबा अशा ११ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. या मतदारसंघातील निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा – ‘निवडणुकीनंतर परत टोल सुरु करण्याचा प्रयत्न झाल्यास..’; राज ठाकरेंचा इशारा
त्यानुसार सभा, मिरवणूक, सभेचे ठिकाण आणि वेळ याबाबतची संबंधित पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना द्यावी. पोलीस परवानगीनंतर सभा, मिरवणुकीचे आयोजन करण्यात यावे. ध्वनीक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायालायने दिलेल्या आदेशाचे पालन करावे. रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत ध्वनीक्षेपक वारण्यास बंदी आहे, असे सहपोलीस आयुक्त शर्मा यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. संबंधित आदेश २५ नोव्हेंबर मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत. आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
पोलिसांचे आदेश
– शाळा, महाविद्यालय, रुग्णालयाच्या परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करु नये
– प्रचार वाहनांनी ध्वनीक्षेपकाचा वापर वाहन थांबवून करावा
– ध्वनीक्षेपक वापराचा परवाना बाळगणे बंधनकारक
– ध्वनीक्षेपक वापर, निश्चित केलेल्या वेळेवर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवावे