Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
पिंपरीत अवयदानामुळे पाच जणांना मिळाले नवजीवन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/IMG-20181012-WA0003.jpg)
डाॅ.डी.वाय.पाटील हाॅस्पीटलमध्ये प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरीतील डाॅ.डी.वाय.पाटील हाॅस्पीटलमध्ये यकृत, दोन मूत्रपिंड आणि दोन नेत्रपटल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अवयवदात्याच्या नातेवाईकांचा निर्णय आणि रुग्णालयातील डाॅक्टरांच्या व कर्मचा-याच्या वेगवान कृतीमूळे पाच रुग्णांना नवे जीवनदान मिळाले आहे. अवयवदान श्रेष्ठदान आहे. पिंपरी चिंचवड शहरात अवयवदानाबाबत जनजागृती अभियान राबविले जात असून ना नफा ना तोटा तत्वानूसार हाॅस्पीटलमध्ये 35 किडणी, लिव्हर, नेत्रपटल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झालेल्या आहेत, अशी माहिती संस्थेच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अमरजित सिंग, संचालिका डॉ वत्सला स्वामी, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर अधिष्ठाता, काॅपोरेट हेड डॉ पी एस गरच्या, प्राध्यापिका डॉ वैशाली भारंबे उपस्थित होते.
डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, हॉस्पिटल व संशोधन केंद्रामध्ये सोमवार (दि.१) एका २७ वर्षीय रुग्ण महिला मेंदू मृत (ब्रेन डेड) घोषित केले होते. रुग्ण महिलेच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला होता. मानवी प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदीनुसार रुग्णाच्या कुटुंबियांना अवयवदानाविषयी समुपदेशन करण्यात आले. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करुन त्यांनी दुःखाचा आघात बाजूला सारून ब्रेन डेड रुग्णांच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यामुळे यकृत, दोन मूत्रपिन्ड, दोन नेत्रपटल हे अवयवदान केले.
पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या प्रतीक्षा यादीनूसार यकृत, एक मूत्रपिंड आणि दोन नेत्रपटल हे अवयव डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटल, पिंपरीत तर दुसरे मूत्रपिंड नाशिक येथील खाजगी रुग्णालयात येथे देण्यात आले. यामध्ये एका ५८ वर्षीय रुग्ण यकृत विकाराने ग्रस्त होता. या रुग्णावर यकृत प्रत्यारोपण तर २७ वर्षीय रुग्ण ८ महिन्यापासून मूत्रपिंड विकाराने ग्रस्त होता. या रुग्णावर मूत्रपिंडप्रत्यारोपण तसेच दोन रुग्णांवर नेत्रपटल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
यकृत प्रत्यारोपण व हेपॅटॉबिलिअरी सर्जन डॉ. बिपीन विभूते व अवयव प्रत्यारोपण टीमची यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा सौ भाग्यश्रीताई पाटील यांनी ब्रेन डेड रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली. नातेवाईक असह्य दु:खात असताना स्वत:ला सावरत अवयवदानच्या या धाडसी निर्णयाबद्दल नातेवाइकांचे आभार मानले.
अवयवाच्या प्रत्यारोपणाबाबतीत नागरिकांमध्ये जागरूकता वाढणे ही एक प्रोत्साहन देणारी आनंददायी बाब आहे. परंतु अवयवाची गरज असणारे रुग्ण आणि अवयवदाते यांच्या संख्येत अजुनही प्रचंड तफावत आहे. म्हणूनच जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करणे आवश्यक आहे. अवयवदात्याच्या नातेवाईकांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांनी आभार मानले. तसेच या संपूर्ण प्रक्रियेसाठी विश्वस्थ डॉ. सोमनाथ पाटील व डॉ. यशराज पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.