महापालिका प्राथमिक व माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संवाद सत्र संपन्न
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/mahaenews-49-1-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी शिक्षणाचे वातावरण निर्माण करण्याचे महापालिकेचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी शालेय सुरक्षा, आरोग्य, अन्न गुणवत्ता आणि स्वच्छता या सर्व बाबींवर गांभीर्याने लक्ष देऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर मुख्याध्यापकांनी भर द्यावा. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्वरित सारथी पोर्टलवर तक्रार नोंदवावी, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिल्या.
महापालिकेच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांसोबत चिंचवड येथील ऑटोक्लस्टर येथे संवादसत्राचे आयोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आले होते. या संवादसत्रात बोलताना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी संबंधित विभागप्रमुख, अधिकारी व मुख्याध्यापकांना विविध सूचना केल्या, त्यावेळी ते बोलत होते.
या संवाद सत्रास सहशहर अभियंता संजय खाबडे, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आरोग्याधिकारी गणेश देशपांडे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, कार्यकारी अभियंता प्रकाश कातोरे तसेच महापालिका शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील म्हणाले, शाळेची सुरक्षा ही मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे. सुरक्षेच्या उपाययोजनांना अधिक बळ देण्यासाठी शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत असल्याची खात्री करून घेणे तसेच सुस्थितीत नसल्यास संबंधितांना याबाबत कळविणे हीसुद्धा मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे. तसेच मध्यान्ह भोजनाचा दर्जा टिकवून ठेवण्यावर भर देणे गरजेचे आहे. दर महिन्याला भोजनाचा अहवाल तयार करून अन्नाचे वर्गीकरण चांगले किंवा निकृष्ट दर्जाचे असे केले पाहिजे. अन्नाचा दर्जा खराब असल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच शाळा परिसर दिवसातून दोनवेळा आणि शाळेचे स्वच्छतागृह तीनवेळा स्वच्छ करणे बंधनकारक आहे. याबाबत मासिक स्वच्छता अहवाल तयार करून सादर करणे गरजेचे आहे.
हेही वाचा – To The Point : मोदी सरकारच्या धोरणांचा ‘महाराष्ट्र धर्म’ : राज्यात महत्वाच्या योजना, गुंतवणुकीतही वाढ!
शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात म्हणाले, शाळा व्यवस्थापन समितीचा शाळेच्या विकासामध्ये सक्रीय सहभाग असणे गरजेचे आहे. त्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीमध्ये योग्य समन्वय साधून शाळांचा दर्जा तसेच शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यावर भर द्यायला हवा. तसेच शिष्यवृत्ती परिक्षेसाठी शाळा स्तरावर सुनियोजन करून उत्कृष्ट निकाल येण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी शिष्यवृत्ती परिक्षेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत. मुख्याध्यापकांना स्थापत्य, स्वच्छता किंवा आरोग्य आणि सुरक्षेसंबधित कोणतीही अडचण किंवा तक्रार असल्यास त्यांनी महापालिकेच्या सारथी ऍपवर तक्रार नोंदवावी. या तक्रारींची दखल घेऊन तात्काळ त्यावर तोडगा काढण्यात येईल.
आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी, महापालिका शाळांमध्ये शून्य कचरा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम केवळ आरोग्य विभागाची जबाबदारी नसून यामध्ये शाळांचा सहभागही तितकाच महत्वाचा आहे. मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी या उपक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले पाहिजे जेणेकरून त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच स्वच्छतेचे महत्व रुजायला मदत मिळेल. सध्या ४० शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून आणखी १६ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून हळूहळू सर्व शाळांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे म्हणाले, शाळेच्या परिसरानुसार तसेच पटसंख्येनुसार प्रत्येक शाळेमध्ये सुमारे २७१ सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे सुरक्षा रक्षक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत तसेच शाळेच्या मागणीनुसार सुरक्षा रक्षक वाढवून देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यासाठी मेस्को (महाराष्ट्र एक्स-सर्व्हिसमेन कॉर्पोरेशन लिमिटेड) च्या सहकार्याने १६ ऑक्टोबर २०२४ रोजी अ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या शाळांपासून टप्प्याटप्प्याने आठही क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये आणखी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार असल्याची माहिती देखील मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांनी यावेळी दिली.
यावेळी उपस्थित मुख्याध्यापकांनी आपल्या शंका, समस्या आणि सूचना मांडल्या. तसेच या संवादसत्रात शाळा व विद्यार्थी सुरक्षा, स्वच्छता व आरोग्य, शालेय पोषण आहाराचे व्यवस्थापन, प्राथमिक शाळांमध्ये स्थापित केलेल्या वर्गग्रंथालयांचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी उपयुक्त नियोजन, शाळा व्यवस्थापन समितीचा शाळा विकासामध्ये सक्रिय सहभाग, प्राथमिक मुख्यध्यापकांच्या क्लस्टर मिटींग, पर्यवेक्षक शाळा भेटी व संनियंत्रण अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.