महापालिकेवर आणखी ५१ गावांच्या पाण्याचा भार

पुणे : पीएमआरडीएने बांधकाम परवानगी देताना पाणी पुरवठ्याच्या अटीत बदल केला आहे. त्यानुसार पीएमआरडीएने पाणी पुरवठ्याची जबाबदारी आता संबंधित महापालिकेवर ढकलत राज्य शासनाच्या नोव्हेंबर १९६०च्या आदेशाचा संदर्भ घेत पालिकेने हद्दीजवळील ५ कि.मी.च्या अंतराच्या गावांना पाणी देणे बंधनकारक असल्याचे महापालिकेस कळविले आहे.
त्यामुळे या गावांमधील रखडलेल्या बांधकामांचा प्रश्न मार्गी लागणार असला तरी या आदेशामुळे महापालिकेस हद्दीजवळील तब्बल ५१ गावांना पाणी द्यावे लागणार आहे.माण, हिंजवडीसह, सोलापूर रस्त्याच्या बाजूला थेऊरपर्यंत, नगर रस्त्याच्या बाजूला केसनंदपर्यंत तर सासवडच्या बाजूला थेट बोपदेव गावांपर्यंत महापालिकेस पाणी द्यावे लागणार आहे.त्यामुळे आधीच अर्ध्या शहराला एकवेळ पाणी दिले जात असताना आणि नवीन ३४ गावांना टॅंकरचे पाणी दिले जात असताना या नवीन ५१ गावांना पाणी आणायचे कोठून, असा प्रश्न आता महापालिका प्रशासनाला पडला आहे.
पुणे महापालिकेत २०१७ मध्ये ११ गावे आणि त्यानंतर २०२१ मध्ये २३ गावांचा समावेश झाला आहे. त्यामधील २३ गावांमधील बांधकाम परवानगीचे अधिकार पीएमआरडीएकडे आहेत.पीएमआरडीएने या गावामध्ये बांधकाम परवानगी देताना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी संबंधित बांधकाम व्यावसायिकावर दिली होती.
हेही वाचा – ‘आम्हाला भारताबरोबर चांगले संबंध हवेत, पण..’; मोहम्मद युनूस यांचं विधान
त्यामुळे पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील बांधकाम आणि समूह गृहबांधणी प्रकल्पांना पाण्याची उपलब्धता असल्याशिवाय यापूर्वी बांधकाम परवानगी देण्यात येत नव्हती. विकसकाकडून पाणी पुरवठ्यासंदर्भात हमीपत्र घेण्यात येत होते; पण आता अटीमध्ये बदल केला आहे त्यासाठी, शासनाच्या ६४ वर्षाच्या जुन्या आदेशाचा आधार घेण्यात आला आहे.खडकवासला प्रकल्पातून शहरासाठी १७ टीएमसी पाणी घेतले जाते. महापालिकेत नवीन गावांचा समावेश झाल्यानंतर या २३ गावांना पाणी देण्यासाठी पालिकेला २१ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.
तसेच, महापालिकेने मुळशी धरणातून अतिरिक्त पाण्याची मागणी केली आहे. पाटबंधारे विभागाने महापालिकेस केवळ १४.८२ टीएमसी पाणीकोटाच मंजूर केला आहे.त्यामुळे शहराला आणि समाविष्ट गावांना पाणी देताना महापालिकेची तारांबळ होत असताना त्यात नवीन ४७ गावांसाठी जवळपास ३ ते ४ टीएमसी अतिरिक्त पाणी गरजेचे असून हे पाणी आणायचे कोठुन याबाबत महापालिका प्रशासन चिंतेत आहे.
पूर्वेच्या हद्दीकडील गावे : वडकी, लोणीकाळभोर, कुंजीरवाडी, कदमाकवस्ती, थेउर, कोलवडी, अव्हाळवाडी, मांजरी खुर्द, ताळेरणवाडी, केसनंद, भावणी, लोणीकंद, तुळापूर, फुलगाव.दक्षिणेच्या हद्दीकडील गावे : काळेवाडी, झेंडेवाडी, जाधववाडी, चांबळी, बोपगाव, गराडे, आस्करवाडी, पठारवाडी, भिवडी, शिंदेवाडी, ससेवाडी, गोगलवाडी, वेळू, डोणजे, तानाजीनगर, गौडदरा, आर्वी, मोरदरा, थोपटेवाडी, घेरा सिंहगड.





