‘पुतळा कोसळणं हा अपघात, वाईटातून चांगलं घडायचं असेल, यासाठी अपघात’; दीपक केसरकरांच्या दाव्यानं वादाची शक्यता

Deepak Kesarkar | मालवण येथील राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या २८ फुटी पुतळ्याचे लोकार्पण केले होते. मात्र आता हा पुतळा सोमवारी कोसळला. हा पुतळा कोसळ्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शालेय शिक्षण मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी ही दुर्घटना घडली त्या ठिकाणी मंगळवारी भेट दिली. यावेळी केसरकर यांनी त्याचठिकाणी १०० फूट उंचीच्या पुतळ्याची उभारणी करावी, अशी मागणी केली आहे.
दीपक केसरकर म्हणाले, पुतळा कोसळणे हे दुर्दैवी आहेच. या पुतळ्याची उंची २८ फूट होती. मात्र येथील लोकांनी १०० फुटांचा पुतळा असावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. जर १०० फुटांचा पुतळा याठिकाणी उभा केल्यास ती सर्वांसाठीच अभिमानाची बाब असेल. मी राजकोट किल्ल्याचा दौरा करून पाहणी करणार आहे.
हेही वाचा – हेल्मेट न घालता कार चालवल्याने एक हजारांचा दंड, नेमकं काय घडलं?
सध्या मला वाटतं हा एक अपघात आहे. त्यामुळे लोकांनी त्याचप्रकारे ते घ्याव. असं असेल की वाईटातून चांगलं घडायचं असेल. त्यामुळे हा अपघात घडला असेल. काही सांगता येत नाही. अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे कारवाई करेल. पण कारवाई केल्यामळे भावना भरुन येत नाही, असंही दीपक केसरकर म्हणाले.




