ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर

शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत ते इंग्लंडच्या संसदेत गौरव, डोंगराएवढी कारकीर्द

मुंबई : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. राज्य सरकारकडून २०२४ च्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झाला आहे. यासोबतच, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कारांची आणि बारा राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचीही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञांची समिती या पुरस्कारांची शिफारस करत असते. विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असून सर्व पुरस्कारार्थींचे मंत्री मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.

अनुराधा पौडवाल या ज्येष्ठ गायिका आहेत. त्यांनी गायलेली गाणी आणि भजन यामुळे त्या महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचल्या आहे. अनुराधा यांनी फक्त गाणी गायली नाहीत. तर त्यांनी आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून समाजकार्य देखील केलं आहे. अनुराधा पौडवाल यांनी गीत गायनामधून मिळालेल्या पैशांचा उपयोग शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी, गरिबांच्या घरांना विजेची जोडणी करुन देण्यासाठी तसेच कुपोषणाच्या समस्यांच्या निवारणासाठी आपल्यापरिने सामाजिक काम केलं आहे. अनुराधा पौडवाल यांच्या संगीत कारकीर्दीबद्दल आणि समाजकार्यबद्दल त्यांना 2018 मध्ये इंग्लंडच्या संसदेत गौरवण्यात आलं होतं. यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने त्यांना गौरवण्यात येणार आहे.

यावर्षी कुणाला कुठला पुरस्कार जाहीर?
संगीत आणि गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदानाबद्दल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालेला आहे.
भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार आरती अंकलीकर-टिकेकर यांना जाहीर झाला आहे.

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार- २०२४ साठी मराठी रंगभूमीवर कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या प्रकाश बुध्दीसागर यांना जाहीर झाला आहे.
संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव २०२४ चा पुरस्कार शुभदा दादरकर यांना जाहीर झाला आहे.

संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्याबद्दल सन २०२४ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजयजी महाराज पाचपोर यांना जाहीर झाला आहे.
तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर जीवनगौरव पुरस्कार २०२३ साठी शशिकला झुंबर सुक्रे यांच्या नावाची घोषणा झाली असून, २०२४ साठीचा पुरस्कार जनार्दन वायदंडे यांना जाहीर झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button