breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुणेकरांची लाइफलाइन ‘व्हेंटिलेटर’वर! २०० हून अधिक बस प्रवासी सेवेतून बाद

पुणे : कधी ब्रेकडाऊन, कधी स्क्रॅप तर कधी ठेकेदारांचे कॉन्ट्रॅक्ट संपले… अशा विविध कारणांवरून पीएमपीच्या ताफ्यातील बसची संख्या दिवसेंदिवस घटतच आहे. दुसरीकडे पुणे परिवहन महामंडळाने ताफ्यात नवीन बस आणण्यासाठी राबविलेल्या प्रक्रियेला कंपन्यांचा प्रतिसाद मिळत नाही. फेब्रुवारी महिन्यात सुरू केलेल्या बस खरेदीच्या निविदा प्रक्रियेला ऑगस्ट उलटून गेला तरी चांगला प्रतिसाद मिळाला नाही, असे महामंडळाच्याच अधिकाऱ्यांनी सांगितले. यावरून पुणेकरांची लाइफलाइन असलेली पीएमपीच ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे दिसून येत आहे.

पीएमपीच्या सातपैकी २ ठेकेदारांची सेवा संपली आहे. त्यामुळे सुमारे २३३ बस या प्रवासी सेवेतून बाद झाल्या आहेत. तर जून महिन्यात ६० बसेसचे १२ वर्षे पूर्ण झाल्याने त्यांचे आयुर्मान संपले आहे. त्यातच बसचे ब्रेकडाऊनचे प्रमाणही वाढत चालले आहे. बसची संख्या मुळात कमी असताना नवीन बसचा मार्गदेखील खडतर ठरत आहे. याचा फटका पीएमपीसोबतच प्रवाशांना बसत आहे.

हेही वाचा      –        विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

‘पीएमपी’ची प्रवासी संख्या २०१६ मध्ये १० लाख होती. त्यावेळी ‘पीएमपी’च्या २ हजार ५५ बस संचालनात होत्या. त्यानंतर ८ वर्षांनी म्हणजेच २०२४ मध्ये ती १३ ते १४ लाख झाली आहे. यावेळी फक्त १ हजार ५२८ बस मार्गावर असून, त्यांची संख्या दिवसेंदिवस घटतच आहे. वाढत्या लोकसंख्येला पुरी पडेल, अशी यंत्रणा उभी करण्यात ‘पीएमपी’ला अपयश आल्याचे आणि त्यातूनच वाहतुकीची भीषण समस्या उभी राहिल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.

पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे ५०० बस १२ वर्षे पूर्ण झाल्यामुळे पुढील काही महिन्यांतच त्या संचालनातून बाहेर पडणार आहेत. अशातच तिसऱ्यांदा फेरनिविदा प्रक्रिया सुरू करूनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने महामंडळापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button