ताज्या घडामोडीमुंबई

नवी मुंबईत मुसळधार पाऊस, नालेसफाई व्यवस्थित नसल्याने पाणी साचले

पालिकेच्या नालेसफाई कामावर प्रश्नचिन्ह अनेक भागात पहिल्यांदाच पाणी

नवी मुंबई : शहरामध्ये सतत मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. सानपाडा आणि जुईनगर या भागांमध्ये जास्त पाणी साचलेलं पाहायला मिळालं आहे. पावसामुळे सानपाडा परिसर हा पाण्याखाली गेला आहे. नवी मुंबई शहर स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहायला मिळत असल्याचं नागरिकांचे म्हणणं आहे. विशेष म्हणजे कांदळवणाचं क्षेत्र नष्ट करून अनेक भूमाफियांनी डेब्रिज टाकून मैदानी गोडाऊन तयार केली आणि त्यात नवी मुंबई महानगरपालिकेची नालेसफाई व्यवस्थित नसल्यामुळे पाणी सानपाडा आणि जुईनगर भागात शिरल्याचं पाहायला मिळालं असल्याचं नागरिकांचे म्हणणं आहे.

कांदळवन नष्ट करून अतिक्रमण करणाऱ्यांवर नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी कानाडोळा करत आहेत. त्यामुळे शहरवासीयांना ही परिस्थिती अनुभवायला मिळाली. येणाऱ्या काळामध्ये हे दोन्ही विभाग पाण्याखाली जाऊन संपूर्ण नवी मुंबई शहर हे जलमय होण्याची शक्यता निर्माण झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नवी मुंबई शहराला सकाळपासून पावसाने झोडपलं असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर तुडुंब पाणी भरलेलं आहे.

तरुणांनी या रस्त्यावरील पाण्याला स्विमिंग पूल करत आनंद घेतला आहे. सकाळपासून झालेल्या पावसाने संपूर्ण रस्ते हे गच्च पाण्याने भरले होते. या पाण्यात तरुणांनी उड्या मारत, खेळत सायकली फिरवत मौज मजा मस्ती करत स्विमिंग पूल बनवून आनंद लुटल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे अनेकांच्या गाड्या यामध्ये बंद पडल्या होत्या. अनेक जण जीव मुठीत धरून वाट काढत होते. मात्र तरुणाई या पाण्याचा जोरदार आनंद लुटत होती.

दरम्यान बेलापूर सेक्टर ८ बी जय दुर्गा माता नगर येथे डॅम परिसरात ६० हून अधिक पर्यटक अडकले होते. पावसाचा आनंद लुटण्यासाठी ६० हून अधिक पर्यटक तेथे गेले होते. मात्र नवी मुंबई शहरात २ ते ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आज पावसाचा जोर अचानक वाढल्यामुळे पाण्याचा वेग वाढला. त्यामुळे हे पर्यटक तिथेच अडकले. प्रशासनाने मुसळधार पावसाचा इशारा दिला असला तरी पर्यटक तरुण मुलांना फिरण्याचा मोह आवरत नाही आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button