breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘बायो डायर्व्हसिटी पार्क’ साठी एकच ठेकेदार पात्र!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे तळवडे येथील ७० एकर गायरान जागेत जैवविविधता उद्यान (बायोडायर्व्हसिटी पार्क) विकसित करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या स्थापत्य उद्यान विभागाने सुमारे ७४ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. यामध्ये सहभागी ठेकेदारांपैकी तीन ठेकेदार अपात्र ठरले असून एकच ठेकेदार पात्र ठरला आहे. या निविदेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

तळवडे येथे महापलिकेला मिळालेल्या गायरान जागेत डीअर पार्क बनविण्याचा निर्णय झाला होता. परंतु, नागरी वस्ती वाढल्याने डीअर पार्कचा निर्णय रद्द करून तेथे बायोडायर्व्हसिटी तयार करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.  सुरुवातीला सीएसआर निधीतून हे उद्यान विकसित करण्याचे नियोजन होते. परंतु, आता पालिका खर्चातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यानुसार महापालिकेने बायोडायर्व्हसिटी प्रकल्पासाठी सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात तरतूद केली. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली. त्यानंतर महापालिकेने जैवविविधता उद्यानासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

हेही वाचा – Breaking News । राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी फुंकली ‘बंडाची तुतारी’

या उद्यानाच्या कामासाठी एकूण ७४ कोटी ५३ लाख ५५ हजार २७९ रुपये इतका खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. निविदा भरण्यासाठी दिलेल्या पहिल्या मुदतीत चार कंत्राटदार सहभागी झाले. मात्र, त्यापैकी तीन कंपन्या अपात्र ठरल्या असून बीव्हीजी इंडिया ही एकच कंपनी पात्र ठरली आहे. एकच कंपनी पात्र ठरल्यामुळे या कामासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार कंत्राटदारांना निविदा दाखल करण्यासाठी येत्या ८ ऑगस्टपर्यंत मुदत आहे.

तळवडे येथील गायरान ७० एकर जागेत जैवविविधता व वन्य परिसर संवर्धन, वन्य पशू-पक्षी संवर्धनासाठी हा प्रकल्प होत आहे. वेगवेगळे वनस्पती, दुर्मीळ औषधी झाडे व वेली, देशी जातीची झाडे, फळ व फूल झाडे असतील. जलस्रोतांचे संवर्धन केले जाणार आहे. प्रकल्पांची माहिती दर्शविणारे फलक व पर्यटकांना फिरण्यासाठी ट्रॅक, खाद्यपदार्थांचे स्टॉल, विविध थीम पार्क, खुले प्रेक्षागृह, जैवविविधता प्रबोधन केंद्र इ. बाबींचा येथे समावेश असणार आहे.

जैवविविधता उद्यानासाठी होणा-या खर्चावर पर्यावरण प्रेमींकडून आक्षेप घेतला जात आहे. पर्यावरणप्रेमी प्रशांत राऊळ यांनी म्हटले आहे की, एक पर्यावरण प्रेमी म्हणून जैवविविधता उद्यान होत आहे, याचा आनंद आहे. परंतु, त्याकरिता जो अवाढव्य खर्च होत आहे, तसेच, संबधितांची संशयास्पद भूमिका याला नक्कीच आक्षेप आहे. या प्रकल्पाबाबत माहिती अधिकारातून माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने व यापूर्वी झालेल्या खर्चावरून शंका येण्यास वाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button