Breaking News । राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी फुंकली ‘बंडाची तुतारी’
राहुल भोसले, पंकज भालेकर, यश साने यांचाही राजीनामा : येत्या २० तारखेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणार!
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. तसेच, त्यांचे समर्थक राहुल भोसले यांनी कार्याध्यक्षपदाचा, पंकज भालेकर यांनी विधानसभा प्रमुख पदाचा आणि यश साने यांनी विद्यार्थी सेल शहराध्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
येत्या २० जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा पिंपरी-चिंचवडमध्ये विजयी संकल्प मेळावा होणार आहे. त्यामध्ये अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह ४० जण प्रवेश करतील, अशी चर्चा होती. मध्यंतरी गव्हाणे यांनी पवार साहेबांची भेटही घेतली होती.
लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठे यश मिळाले. एकूण १० पैकी ८ जागांवर पक्षाच्या उमेदवारांचा विजय झाला. तसेच, महाविकास आघाडीला महायुतीच्या तुलनेत घवघवीत यश मिळाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजित गव्हाणे यांनी ‘तुतारी’ हातात घेतली आहे, असा दावा केला जातो. महाविकास आघाडीकडून गव्हाणे यांचा दावा निश्चित झाल्यास, शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले सुलभा उबाळे, धनंजय आल्हाट यांना उमेदवारीवर पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्याकडे गव्हाणे यांनी राजीनामा पाठवला आहे. तसेच, पंकज भालेकर, राहुल भोसले आणि यश साने यांनीही बंड केल्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा विजयी संकल्प मेळावा दि. २० जुलै रोजी होणार आहे. साहेबांच्या नेतृत्त्वावर विश्वास असलेले अनेकजण प्रवेश करतील. आगामी विधानसभा निवडणुकीत शहरातील तीनपैकी दोन मतदार संघामध्ये पक्षाकडून सक्षम उमेदवार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार तीनही मतदार संघात विजय खेचून आणतील, असा आम्हाला विश्वास आहे.
– तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष.
राष्ट्रवादीचा नवा शहराध्यक्ष योगेश बहल?
दरम्यान, अजित गव्हाणे पक्षाला रामराम ठोकणार हे निश्चित झाल्यानंतर आता अजित पवार शहरातील पक्षाची संघटनात्मक धुरा कोणाच्या खांद्यावर देणार? याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. त्यामुळे स्थानिक नेते, गावकी-भावकी यांना शह देण्याची क्षमता असलेले माजी महापौर योगेश बहल यांना पुन्हा संघटनात्मक प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात येईल. तसेच, विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांमध्ये राष्ट्रवादीला महायुतीमध्ये ३ जागा मिळतील. त्यामध्ये विधान परिषदेवर योगेश बहल यांना संधी देण्यात येईल, असे समजते. शहराध्यक्ष, नगरसेवक, महापौर, सत्तारुढ पक्षनेता, विरोधी पक्षनेता असा दीघ अनुभव असलेले योगेश बहल राष्ट्रवादीसाठी आता ‘संकटमोचक’ म्हणून पुढे येण्याची दाट शक्यता आहे.









