Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘आता फक्त दाऊदला क्लिनचीट देणं बाकी’; वायकरांना मिळालेल्या क्लिनचीटवरून संजय राऊतांचा टोला

मुंबई | अमोल कीर्तिकरांच्या विरोधात अवघ्या ४८ मतांनी जिंकलेले शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांनी भूखंड घोटाळा प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) न्यायालयात ‘सी समरी रिपोर्ट’ दाखल करण्यात आला. या अहवालात मुंबई महापालिकेने वायकरांच्या विरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे. तसंच रवींद्र वायकरांविरोधातले गुन्हे मागे घेतल्याचीही माहिती आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले, रवींद्र वायकरांना क्लीन चिट मिळाली आहे. दुसरं काय होऊ शकतं? आता फक्त दाऊद इब्राहीमला क्लीन चिट मिळणं बाकी आहे. हे सरकार महाराष्ट्रातलं ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेतं आहे आणि आमची ताकद किती वाढली आहे हे असं दंड फुगवून सांगत आहे. या लोकांच्या विरोधात कारवाई करा, खटले दाखल करा हे सांगणारे हेच लोक आहेत. रवींद्र वायकर तर घाबरुन पळूनच गेले.

हेही वाचा    –      शत्रुघ्न काटे स्पोर्टस् अकॅडमीच्या स्केटर्सची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद

मोदींच्या सरकारमध्ये किंवा या सरकारमध्ये दुसरं काय होऊ शकतं? हे काही कायद्याचं राज्य आहे का? याचा अर्थ असाच होतो की आमच्या लोकांविरोधात खोटे खटले दाखल केले, गुन्हे दाखल केले आणि तुम्ही त्यांना पक्षात घेतलं हे तुम्ही मान्य करा. आमच्यासह सगळ्यांवर असे खोटे गुन्हे, खटले दाखल करुन आमच्यावर दबाव आणायचा प्रयत्न केला. आमच्यासारखे काही लोक दबावाला बळी पडले नाहीत. ज्यांचं काळीज उंदरासारखं आहे ते पळून गेले. अजित पवार पळाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पळाले, त्यांच्या बरोबरचे आमदार पळाले. असे अनेक लोक गेले, वायकर त्यातलेच आहेत. भाजपाने हे मान्य केलं पाहिजे आम्ही यांच्यावर भीती निर्माण करण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले होते, असा टोला संजय राऊतांनी भाजपला लगावला आहे.

नवाब मलिकांवरचे गुन्हे मागे घेतले तसे आमच्यावरचे गुन्हे मागे घ्या. आमच्याही मालमत्ता जप्त केल्या आहेत ते पण मागे घ्या. किरीट सोमय्या काय सांगतील, फडतूस माणूस आहे तो. आता त्यांनी वायकरांवर बोलावं. भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीनमध्ये धुण्याचं काम चाललं आहे त्यावर बोलावं. वायकरांवरचे खटले मागे घेतले जात असताना सोमय्या गप्प का बसलेत? खरे असाल, तुमचं रक्त शुद्ध असेल तर बोला यावर, असं संजय राऊत म्हणाले.

गैरसमजुतीतून वायकरांविरोधात गुन्हा झाला हे आर्थिक गुन्हे शाखा म्हणत असेल तर मी हे सांगतो की असे अनेक गुन्हे राजकीय गैरसमजातूनच त्यांनी दाखल केले आहेत. राजकीय दबाव आणि गैरसमजुतीतूनच हे गु्न्हे आमच्यासारख्यांवरही दाखल झाले आहेत. आर्थिक गुन्हे शाखा असे गैसमजातून गुन्हे दाखल करु शकतं का? असंही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button