..तर नरेंद्र मोदी पराभूत झाले असते; राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल
![Rahul Gandhi said that if Narendra Modi had fought from Ayodhya, he would have definitely lost](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Rahul-Gandhi-780x470.jpg)
नवी दिल्ली | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर लोकसभेत आज चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यानिमित्ताने आज पहिल्यांदाच भाषण केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच अयोध्येचा उल्लेख करताना ते म्हणाले की, जर पंतप्रधान मोदी अयोध्येतून निवडणुकीला उभे राहिले असते तर ते तिथून पराभूत झाले असते.
भाजपाने हिंदुत्त्वाच्या नावावर देशात भीतीचे वातावरण पसरवले आहे, असा आरोप राहुल गांधींनी केला. तसेच, अयोध्याने भाजपाला संदेश दिला आहे. रामभक्तांनी भाजपाला संदेश दिला आहे. जर पंतप्रधान मोदी अयोध्येतून निवडणुकीला उभे राहिले असते तर ते तिथून पराभूत झाले असते. असे राहुल गांधी यांनी म्हणताच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावर आक्षेप घेतला.
हेही वाचा – गट क ची परीक्षा एमपीएससीतर्फे घेणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
राहुल गांधी पुढे म्हणाले, भाजपाने राम मंदिराचे उदघाटन केले. मी अवधेश प्रसाद यांना विचारले की, तुम्हाला कधी कळले की, तुम्ही अयोध्येत जिंकू शकतात. ते म्हणाले, मला पहिल्या दिवसापासून माहीत होते की, मीच जिंकणार. अयोध्येत विमानतळ बनविण्यासाठी अयोध्यावासियांची जमीन हिसकावली गेली. आजपर्यंत त्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. अयोध्येतील छोटे छोटे दुकानदार, छोट्या इमारतींना पाडण्यात आले. त्यांना रस्त्यावर आणले गेले. राम मंदिर उदघाटनाला उद्योगपती अदाणी, अंबानींना बोलविण्यात आले. मात्र अयोध्यामधील कुणीही नव्हते.
अयोध्यावासियांच्या मनात नरेंद्र मोदी यांनी भय निर्माण केले. त्यांची जमीन घेतली. त्यांचे घर पाडले. त्यानंतर सामान्य अयोध्यावासियांना मंदिर उदघाटनावेळी दूर ठेवले. यामुळेच अयोध्येच्या जनतेने निवडणुकीत याचा वचपा काढला. तसेच नरेंद्र मोदी यांनी दोन वेळा अयोध्यातून निवडणूक लढविण्यासाठी सर्व्हे केला. दोन्ही वेळा सर्व्हे करणाऱ्यांनी त्यांना अयोध्येतून निवडणूक लढविण्यास विरोध केला. जर ते तिथून लढले असते तर त्यांचा पराभव झाला असता. म्हणूनच पंतप्रधान वाराणसीत गेले आणि त्यांचा तिथे निसटता विजय झाला, असंही राहुल गांधी म्हणाले.