मोठी बातमी! सांगोल्यात पाच महिलांना ट्रकने चिरडले

Sangola News: सांगोल्यात एक भीषण अपघात घडला असून तालुक्यातील पंढरपूर-कराड मार्गावर भरधाव ट्रकने पाच महिलांना चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतातील कामे आटोपून घरी माघारी जात असताना हा अपघात झाला.यामध्ये मृत्यू झालेल्या सर्व पाच महिला सांगोला तालुक्यातील कटफळ गावच्या आहेत.
आज दुपारी चारच्या दरम्यान शेतातील काम करून घरी परतणाऱ्या 7 महिलांना, सांगोला तालुक्यातील चिकमहुद गावातील बंडगरवाडी येथे एका ट्रकने चिरडले. यापैकी पाच महिलांचा मृत्यू जागीच झाला तर यामधील दोन महिला गंभीर जखमी झाल्या.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील हातगाडी, फेरीवाल्यांसाठी ‘हॉकर्स झोन’ द्या!
दरम्यान या सर्व महिला कटफळ गावच्या असून, बंडगरवाडीतून कामावरून सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी गाडीची वाट बघत उभ्या होत्या.या दरम्यान कोळसा घेऊन जाणारा एक ट्रक समोरून आला आणि थेट महिलांच्या अंगावार गेला. ट्रकच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह राज्यभरात अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. एकट्या पुण्यात गेल्या महिन्याभरात 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
नागपूरमध्येही दोन दिवसांपूर्वी एका कारणे रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 9 मजुरांना चिरडले होते.या सर्व प्रकरणांमुळे राज्यातील सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.





