‘अजित पवारांचं आव्हान स्वीकारते, पण..’; अंजली दमानियांचं प्रत्युत्तर
![Anjali Damania said that she accepts Ajit Pawar's challenge](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Anjali-Damania-and-Ajit-Pawar-780x470.jpg)
मुंबई | पुण्यातील पोर्श कारच्या अपघातावरून राजकीय वातावरण तापलं आहे. अपघात प्रकरणील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. अजित पवारांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणीही दमानिया यांनी केली होती.
अंजली दमानियांच्या मागणीवर अजित पवारांनीही उत्तर दिलं. मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. परंतु, नार्को टेस्टमध्ये मी निर्दोष आढळलो, तर तिने (अंजली दमानियांनी) पुन्हा माध्यमांपुढे यायचं नाही. गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा, असं आव्हान अजित पवारांनी दमानिया यांना दिलं आहे. अजित पवारांचं हे आव्हान दमानिया यांनी स्वीकारलं आहे.
हेही वाचा – मी 2 जूनला तुरुंगात जाण्यास तयार, सर्वोच्च न्यायालयाने झटका दिल्यानंतर केजरीवाल म्हणाले…
https://x.com/anjali_damania/status/1795846653292970458
अंजली दमानिया म्हणाल्या की, मी नुकतीच प्रसारमाध्यमांवर अजित पवारांची एक प्रतिक्रिया पाहिली. यामध्ये ते म्हणतायत की ते नार्को टेस्ट करायला तयार आहेत. मात्र, त्यांचं म्हणणं आहे की, त्यांनी नार्को टेस्ट केली तर मी माझ्या राजकीय, सामाजिक जीवनातून सन्यांस घेतला पाहिजे, घरी बसलं पाहिजे. मी त्यांचं हे आव्हान स्वीकारते. तुम्ही कृपया तुमची नार्को टेस्ट करा.
तुमचा विशाल अग्रवालशी (अल्पवयीन आरोपीचे वडील) संबंध नाही, तुम्ही या प्रकरणात काहीही केलेलं नाही, हा तुमचा दावा खरा ठरला तर यापुढे मी यातल्या कोणत्याही गोष्टीवर काहीही बोलणार नाही, मी तुम्हाला शब्द देते. तुम्ही नार्को टेस्ट केलीत तर मी या प्रकरणावर कुठेही वाच्यता करणार नाही. मी तुमचं आव्हान स्वीकारते. परंतु, माझी एक विनंती आहे की तुमच्या नार्को टेस्टसाठी प्रश्नावली मी देणार. मी दिलेले प्रश्न तुम्हाला नार्को टेस्टमध्ये विचारले जातील, एवढंच माझं सांगणं आहे, असंही अंजली दमानिया म्हणाल्या.